राज ठाकरे कोणाच्या जीवावर होऊन जाऊ दे म्हणतात? : धनंजय मुंडे
"राज ठाकरे कोणाच्या जीवावर होऊन जाऊ दे म्हणतात आणि काय होऊन जाऊ द्यायचं आहे, हे त्यांनी स्पष्ट करावं," असं धनंजय मुंडे म्हणाले.
बीड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेतील आपल्या भाषणात एकदा काय ते होऊन जाऊ दे असं वक्तव्य केलं. त्याला सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी उत्तर देत टीका केली आहे आहे. "राज ठाकरे कोणाच्या जीवावर होऊन जाऊ दे म्हणतात आणि काय होऊन जाऊ द्यायचं आहे, हे त्यांनी स्पष्ट करावं," असं धनंजय मुंडे म्हणाले. भोंगे काढल्याने आणि हनुमान चालीसा म्हटल्याने देशातील बेरोजगारी संपणार आहे का किंवा महागाई कमी होणार आहे का? हे जर होणार असेल तर राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत करु. मात्र तरुणांची माथी भडकवली तर एक पिढी उद्ध्वस्त होईल," असं धनंजय मुंडे म्हणाले.
राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत सरकारला इशारा देत म्हटलं होतं की "आज तारीख एक आहे. उद्या तारीख दोन आहे. तीन तारखेला ईद आहे. त्यांच्या सणात मला मध्ये यायचं नाही, मात्र 4 तारखेपासून ऐकणार नाही." तसंच सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊन जाऊ दे." असंही म्हटलं होतं.
'भोंगे काढून, हनुमान चालीसा म्हटल्याने नवनिर्माण होणार नाही महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल'
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये एकदा काय ते होऊन जाऊ दे असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याला देखील धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे. होऊन जाऊ दे म्हणजे काय असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित करत भोंगे आणि हनुमान चालीसा म्हटल्याने तरुणांना रोजगार मिळणार आहे का पोटाला भाकरी मिळणार आहे का किंवा महाराष्ट्र प्रगत होणार आहे का, असा प्रतिसवाल धनंजय मुंडे यांनी विचारला. भोंगे काढल्याने आणि हनुमान चालीसा म्हटल्याने नवनिर्माण होणार नाही तर महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल, असं उत्तर धनंजय मुंडे यांनी दिलं. ठाकरे हे कोणाच्या जीवावर होऊन जाऊ दे म्हणतात आणि काय होऊन जाऊ द्यायचं ते देखील त्यांनी स्पष्ट करावं, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये कुठेही बेरोजगारी आणि महागाईवर बोललेलं पाहायला मिळत नाही. राज ठाकरे यांची सभा म्हणजे भोंगा लावणं आणि भोंगा काढणं अशी आहे. त्यामुळे तरुण आणि पुढची पिढी बरबाद होईल असं राज ठाकरे यांनी काही करु नये असा देखील सल्ला धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंना दिला.
'12 कोटी जनता सांगेल पवारसाहेब जातीवादी नाहीत'
हिंदुत्वाच्या प्रश्नावरुन देखील धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांना खडेबोल सुनावले आहेत. प्रत्येक धर्मामध्ये आपापल्या परंपरा आणि प्रथा आहेत त्यामुळे त्याचा बाजार मांडण हे प्रगत महाराष्ट्राला परवडणारं नाही. भोंग्याचं भाडं बदललं की राज ठाकरे शरद पवार यांच्यावर टीका करतात. शरद पवार यांनी आपल्या हयातीमध्ये कधीही जातीपातीचे राजकारण केलं नाही. समाजातील सर्वच घटकांना सोबत घेऊन न्याय देण्याचे काम शरद पवार यांनी केलं आहे. पवारसाहेब जर जातीवादी असतील अस त्यांना वाटत असेल तर राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर माझ्यासोबत चर्चा करावी मग कळेल कोण जातीवादी आहे, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी हिंदुत्वावर चर्चा करण्याचं आव्हान राज ठाकरे यांना दिलं आहे
राज ठाकरे यांची अलर्जी वातावरणानुसार बदलते का? धनंजय मुंडे
शरद पवार यांना हिंदुत्वाची अलर्जी आहे असं राज ठाकरे म्हणतात, मग अडीच वर्षांपूर्वी राज ठाकरे यांना कसली अॅलर्जी होती. वातावरणानुसार राज ठाकरे यांची अॅलर्जी बदलत असते का, असा प्रतिप्रश्न धनंजय मुंडे यांनी विचारला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नावाने नाही तर रयतेच्या हिताचं स्वराज्य निर्माण केलं आणि त्यालाच अनुसरुन पवार साहेब राजकारणात आणि समाजकारणात काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका केल्याने राज ठाकरे यांना मत मिळतील असं वाटत नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले.