स्वाभिमानी संघटनेच्या दूध आंदोलनाला शिवसेना, राष्ट्रवादीचा पाठिंबा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यभर पुकारलेल्या दूध आंदोलनाला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. शिवसेनेनं शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदानाची मागणी केली.
नागपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यभर पुकारलेल्या दूध आंदोलनाला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. राजू शेट्टी यांच्या मागणीला पाठिंबा देत शिवसेना आणि राष्ट्रवादीने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजुने उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.
दुधाच्या मुद्यावरुन विधानसभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. शिवसेनेतर्फे सुनील प्रभू आणि चंद्रदीप नरके यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदानाची मागणी केली. शिवसेनेनं दूध आंदोलनाला पाठिंबा देत पुन्हा एकदा भाजपची कोंडी केली आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही दूध आंदोलनाला पाठिंबा देत भर पावसात आंदोलन केलं. राजू शेट्टी यांनी प्रतिलिटरला केलेली पाच रुपये अनुदानाची मागणी योग्य असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितले. गुजरात सरकारने दुध उत्पादक शेतकऱ्यांना 300 कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले, तर महाराष्ट्र सरकारला काय अडचण आहे? असा सवाल उपस्थित करत अनुदान मिळालेच पाहीजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांनी दूध संघ शेतकऱ्यांना दर देत नसल्याची टीका केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला यासाठी जबाबदार धरलं. कारण सर्वाधिक दूध संघ या दोन्ही पक्षाकडे आहेत. त्यामुळे एकीकडे विरोधक दुधाच्या आंदोलनाला पाठिंबा देत असताना सरकार दूध संघांवर खापर फोडताना दिसत आहे.
दूध दरासाठी आंदोलन दुधाला प्रतिलीटर पाच रुपयांची दरवाढ द्यावी, या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांनी पंढरपुरात विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालत दूध आंदोलन सुरु केलं. अनेक शहरांना होणारा दूधपुरवठा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखला. पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणावर दुधाचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. पुण्यात रस्त्यावर दूध फेकण्यात आलं.
गोकुळसह काही दूध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. सोलापुरातील माढा आणि सांगोला तालुक्यात दूध रस्त्यावर ओतून स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. तर अमरावतीत राजू शेट्टींच्या काही कार्यकर्त्यांनी दुधाचा एक टँकर फोडण्याचा प्रयत्न केला.
संबधित बातम्या
राजू शेट्टींच्या दूध आंदोलनाची सदाभाऊंनी खिल्ली उडवली!
दूध पुरवठा सुरळीत राहिल, तुटवडा निर्माण होऊ देणार नाही : मुख्यमंत्री
मुंबईच्या दुधाची उद्याची पॅकिंग पूर्ण करुन तीन दिवसांचा साठा, 'वारणा'ची तयारी