मुंबई : आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) आमच्यासोबत पाच सहा महिने होते, ते एक गेले तर पाच येतील असं सांगत शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आमच्यासोबत आले तर त्यांचं स्वागत करू असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे  (Ajit Pawar) नेते आणि राज्याचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम (Dharmarao Baba Atram)  यांनी केलं आहे. आपण गडचिरोली लोकसभा निवडणूक (Gadchiroli Chimur Lok  Sabha) लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगत त्यांनी भाजपच्या जागेवर दावाही केला. 


निलेश लंके कामं आटोपून परत गेले


पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अजित पवार गटाला रामराम करून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना धर्मरावबाबा अत्राम म्हणाले की, निलेश लंके हे पाच सहा महिने आमच्याकडे होते. इकडची कामं आटोपून ते तिकडे गेले. एक निलेश लंके गेले तर पाच परत येतील. 


भास्कर जाधवांचं स्वागत करू


शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे नाराज असल्याची चर्चा आहे. गुहागरमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची सभा घेऊन जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यांच्यासाठी आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने पायघड्या घालण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना धर्मरावबाबा अत्राम म्हणाले की, भास्कर जाधव हे आमच्या गटात आले तर त्यांचं स्वागत आहे. ते चांगले नेते असून पूर्वी आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षही होते. 


गडचिरोली लोकसभा लढवण्यासाठी तयार 


गडचिरोली लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असल्याचं सांगत धर्मरावबाबा अत्राम यांनी त्या मतदारसंघावर दावा केला आहे. आपण जर कमळाच्या चिन्हावर लढलो तर ते अजित पवारांनाही आवडणार नाही असंही ते म्हणाले. तसेच आपण जर पडलो आणि भाजपच्या 399 जागा निवडून आल्या, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे '400 पार' स्वप्न पूर्ण होणार नाही.


ही बातमी वाचा :