गडचिरोली : येत्या एक दोन दिवसात लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांची घोषणा (Mahayuti Seat Sharing) होणार असून त्यामध्ये मला तिकिट मिळेल अशी अपेक्षा आहे, मी जर निवडून आलो नाही तर मोदींच्या (PM Narendra Modi) '400 पार'चे स्वप्न पूर्ण होणार नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या धर्मरावबाबा अत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी केलं. गडचिरोलीची (Gadchiroli Chimur Lok  Sabha) जागा ही राष्ट्रवादीलाच मिळणार आहे, मी कमळावर लढलो तर ते अजितदादांनाही चालणार नाही असंही ते म्हणाले. 


मोदींचे 400 जागांचे स्वप्न पूर्ण होणार नाही


अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा अत्राम हे गडचिरोली या मतदारसंघातून लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र या जागेवर भाजपचा दावा आहे. गडचिरोलीमध्ये सध्या भाजपचा खासदार आहे. मात्र या जागेवर अजित पवारांच्या गटातील धर्मराव बाबा अत्राम यांनी दावा केला आहे. ते  म्हणाले की, "लवकरच आज रात्री किंवा उद्या उमेदवारांची यादी जाहीर होईल. मला अपेक्षा आहे की मला उमेदवारी मिळेल. या ठिकाणाहून महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा आहे. मी कमळावर लढले पाहीजे असं दादांचंही मत नाही. गडचीरोलीची जागा आम्हाला मिळाला हवी. मोदीजींचा नारा आहे 400 पार. भाजपचे 399 झाले आणि माझी एक सीट आली नाही तर '400 पार'चे स्वप्न कसं पूर्ण होणार."


मला माझ्या मुलीला आमदार करायचं आहे


धर्मरावबाबा अत्राम म्हणाले की, पुढची पिढी समोर यावी म्हणून मंत्रीपद सोडण्याची,त्यांना संधी द्यायची आणि खासदारकी लढवण्याची इच्छा आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीत मुलीला उमेदवारी द्यायची आहे. त्यावेळी माझ्या भावाचा मुलगा अंबरीश आत्राम आणि माझी मुलगी अशी बहिण भावाची लढत होईल. जसं बारामतीत दादा ताई लढतायत. 


एक निलेश लंके गेले तर पाच येतील


पारनेरचे आमदार निलेश लंके हे अजित पवारांना सोडून शरद पवार गटामध्ये जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना अत्राम म्हणाले की, निलेश लंके हे पाच सहा महिने इकडे होते, कामं आटोपून तिकडे गेले. पण एक गेल्यानं काही फरक पडत नाही. एक गेले तर पाच येतील.


शिवसेनेचे भास्कर जाधव हे  नाराज असल्याची चर्चा असून ते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर बोलताना धर्मरावबाबा अत्राम म्हणाले की, भास्कर जाधव आमच्या गटात आले तर आम्ही त्यांचं स्वागत करणार. ते पूर्वी आमच्या प्रदेशाध्यक्ष होते. भास्कर जाधव चांगले नेते आहेत.


ही बातमी वाचा :