कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना फोडल्यानंतर सोबत आलेल्या खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळवून देण्यासाठी ताकद दावली असली, तरी भाजपकडून त्यांच्यावर पाच जागांवर उमेदवार बदलण्यासाठी दबाव आणला जात आहे. इतकेच नव्हे तर भाजपकडून करण्यात आलेल्या अंतर्गत सर्वेक्षणाचा दाखला देत शिंदेंकडील पाच खासदारांचा पत्ता कट करायला सांगत भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) या जागांवर दावा केला आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या निर्णयावर खुश नसून त्यांची याबाबत नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. 


कोल्हापूरच्या दोन्ही जागांवर भाजपकडून दावा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणताही उमेदवार न बदलता सोबत आलेले खासदार हेच पुन्हा उमेदवार त्या ठिकाणी असतील अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपामध्ये यावर कोणता निर्णय होणार याकडे लक्ष असेल. दरम्यान ज्या जागा बदलण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे, त्यामध्ये कोल्हापूरच्या (Kolhapur) दोन्ही जागांचा समावेश असल्याने भूवया उंचावल्या आहेत.


सर्व्हे विरोधात असल्याने उमेदवार बदलण्याची मागणी


शिंदेंनी शिवसेना फोडल्यानंतर कोल्हापूरमध्ये हादरे बसले होते. यामध्ये विद्यमान दोन्ही खासदार आणि एकमेव सेना आमदार हे शिंदेंना जाऊन मिळाले होते. यामध्ये खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने यांची कोल्हापूर आणि हातकणंगलेमधून उमेदवारी शिंदे गटाकडून निश्चित मानले जात असली, तरी भाजपने केलेला अंतर्गत सर्व्हे या दोघांविरोधात असल्याने त्यांनी थेट उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे. त्यामुळे त्या दोन्ही जागा बदलणार की का? अशी शंका उपस्थित झाली आहे. 


मडाडिक, घाटगे आणि कोरेंसाठी ताकद लावली


कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपकडून गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापूर ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना तयारी करण्यास सांगितली आहे, तर दुसरीकडे धनंजय महाडिक यांचाही पत्ता राखून ठेवला आहे. त्यामुळे या दोन्ही नावांसाठी भाजपकडून आग्रह सुरू आहे. दुसरीकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून अनपेक्षितपणे जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्यासाठी भाजपने चाचपणी सुरू केली आहे. 


कोल्हापूर आणि  हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदारांविरोध वातावरण आहे. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता भाजपकडून या दोन्ही उमेदवारांना बदलण्यासाठी शिंदेंवरती दबाव सुरू आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये सातत्याने दौरे करत या दोन्ही मतदारसंघांवरील दावा कायम केला आहे. तीन दिवसात दोनवेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौरा केला. मात्र, भाजपकडून वाढत चाललेला दबाव यामुळे ते दोन्ही उमेदवार बदलणार का? याकडे लक्ष असेल. 


शिंदेंकडील पाच जागा बदलण्यात याव्यात, भाजप आग्रही


दुसरीकडे महायुतीचा जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे आज (11 मार्च) पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा उपस्थित राहणार आहे. यावेळी शिंदेंकडील पाच जागांवरती चर्चा होणार आहे. शिंदेंकडील ज्या पाच जागा बदलण्यात याव्या, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे त्यामध्ये कोल्हापूर, हातकणंगले या दोन्ही जागांसह बुलढाणा, ठाणे आणि नाशिकच्या जागेचा समावेश आहे. त्यामुळे या जागा बदलण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहमती दर्शवणार का? आणि दर्शवल्यास कोल्हापुरातील दोन्ही जागांवर पाणी सोडणार का? याकडे आता लक्ष असेल. 


इतर महत्वाच्या बातम्या