मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांच्या शेवटच्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टोलवाटोलवी झाल्याचं दिसून आलं. एकनाथ शिंदे यांच्या समोरच देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना खुली ऑफर दिली. तर दुसरीकडे अंबादास दानवे यांचे कौतुक करताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. अंबादास दानवे तुम्ही पुन्हा या, पण याच पक्षातून या असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर मी देवेंद्र फडणवीसांप्रमाणे पुन्हा येईन, पण कुठून येईन ते मात्र विचारू नका असं मिश्कील वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं.
Uddhav Thackeray Vidhan Parishad Speech : नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे
अंबादास दानवे यांची टर्म संपली असं मी म्हणणार नाही. तुमची पहिली टर्म पूर्ण झाली आहे. त्यामुळे 'मी पुन्हा येईन' असं जोरात म्हणा. पण ते याच पक्षातून असंही म्हणा असं उद्धव ठाकरे म्हणाले. अंबादास दानवे यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीच्या समाप्तीनंतर त्यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून ऑफर येण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केल्याची चर्चा सुरू आहे.
एकनाथ शिंदे यांना टोला
त्या आधी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबादास दानवे यांच्याबद्दल बोलताना म्हणाले होते की, अंबादास हा तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाही. तोच संदर्भ घेत उद्धव ठाकरे यांनी टोमणा मारला. ते म्हणाले की, अंबादास दानवे हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत. पण त्यांनी भरलेल्या ताटाशी प्रतारणाही केली नाही. समोरच्या ताटात काही चांगलं दिसलं म्हणून तिथे गेला नाहीत.
पदं येतात आणि पदं जातात, पण जनतेच्या मनात आपली काय प्रतिमा राहते हे महत्वाचं. असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, "गेल्या आठवड्यात अंबादास माझ्या घरी आले होते. त्यावेळी टर्म संपतेय, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही असं मी त्यांना म्हणालो. पण आतापर्यंत जे दिलंय ते खूप दिलंय असं अंबादास म्हणाले."
मुख्यमंत्री माझे आभार मानू शकणार नाहीत
उद्धव ठाकरे म्हणाले की, "भाजपच्या आणि संघाच्या मुशीत घडलेला असा अंबादास दानवे हा कार्यकर्ता भाजपने आम्हाला दिला याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. मात्र ते माझे आभार मानू शकतील की नाही याबद्दल शंका आहे. कारण त्यांनी माझ्याकडून घेतलेले नेते हे वेगळेच आहेत."
ही बातमी वाचा: