दाखवण्यासाठी दौरा करण्यापेक्षा केंद्राकडे राज्याच्या पैशांसाठी पाठपुरावा करा, केंद्रीय मंत्र्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर नवाब मलिकांची टीका
राज्य सरकार जे प्रस्ताव पाठवत आहे त्याबाबत काहीच निर्णय होत नाही. दौरा करण्यापेक्षा जास्त राज्याला काय अपेक्षित आहे याबाबत माहिती घ्या आणि त्याचा पाठपुरावा करावा, असं नवाब मलिक यांनी म्हटलं.
मुंबई : महाराष्ट्रात 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान केंद्रीय मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा आहे. महाराष्ट्रातून नव्यानं केंद्रात मंत्री झालेले नेते महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. नारायण राणे कोकण दौरा करणार आहेत. भारती पवार उत्तर महाराष्ट्रचा दौरा करणार आहेत तर रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यावर मराठवाड्याची जबाबदारी असल्याची माहिती आहे. माझं या सर्वांना सांगणं आहे की, दाखवण्यासाठी दौरा करण्यापेक्षा केंद्राकडे जे राज्याचे पैसे आहेत त्यासाठी पाठपुरावा करा. राज्य सरकार जे प्रस्ताव पाठवत आहे त्याबाबत काहीच निर्णय होत नाही. दौरा करण्यापेक्षा राज्याला काय अपेक्षित आहे याबाबत माहिती घ्या आणि त्याचा पाठपुरावा करा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्याचा समाचार घेतला आहे.
याबाबत अधिक बोलताना नवाब मलिक म्हणाले की, केंद्रीय मंत्र्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र माझं त्यांना हेच सांगणं आहे की, मागील काही वर्षाची जीएसटीची राज्याची रक्कम केंद्रात पडून आहे. जीएसटीचे पैसे राज्यात कसे आणता येतील यासाठी प्रयत्न करावा. दाखवण्यासाठी दौरा करण्यापेक्षा केंद्राकडे जे राज्याचे पैसे आहेत, त्यासाठी पाठपुरावा करा. राज्य सरकार जे प्रस्ताव पाठवत आहे त्याबाबत काहीच निर्णय होत नाही. दौरा करण्यापेक्षा जास्त राज्याला काय अपेक्षित आहे याबाबत माहिती घ्या आणि त्याचा पाठपुरावा करावा.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव बदलून अदानींचे नाव देणे सर्वात मोठी चूक आहे, अशा शब्दात नवाब मलिक यांनी अदानी समूहाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेल्या नावाबाबत टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे नाव बदलून अदानी विमानतळ करणे योग्य नाही. ही अदानींची सर्वात मोठी चूक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
जीव्हीके एअरपोर्टकडून अदानीने सर्व मालकी व शेअर्स खरेदी केल्यानंतर विमानतळाची मालकी अदानींकडे गेली, परंतु याचा अर्थ हा नाही की छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट हे नाव बदलून अदानी एअरपोर्ट करावे. त्यांच्याकडे मॅनेजमेंटचा अधिकार आहे. परंतु नाव बदलण्याचा व नाव ठेवण्याचा अधिकार नाही, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. अदानी एअरपोर्ट लिहिणे हे योग्य नाही. यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे तशी घटना त्याठिकाणी घडली आहे. अदानीने लोकांची भावना दुखावणार नाही याची दक्षता घ्यावी असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे.
एमपीएससी सदस्य निवडीबाबत बोलताना मलिक म्हणाले की, राज्य सरकार ने एमपीएससी सदस्य निवडण्यासाठी अर्ज मागवले होते. त्यानंतर 3 सदस्यांची नावे राज्यपालांकडे पाठवले आहेत. अजूनही निर्णय नाही. आम्हाला आशा आहे की लवकरच राज्यपाल निर्णय घेतील. आता हा विषय राज्यपालांकडे आहे. आशा आहे ते लवकर निर्णय घेतील. 31 जुलैच्या तीन दिवस अगोदर राज्यसरकारने तीन नावे निश्चित करून अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला होता. अपेक्षा आहे लवकरात लवकर त्यावर राज्यपाल हस्ताक्षर करुन प्रस्ताव परत शासनाकडे पाठवतील व त्या नियुक्त्या होऊन एमपीएससीचे कामकाज सुरू होईल. मात्र निर्णय लवकर होणे अपेक्षित आहे असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.