मुंबई : कधी शेती, कधी शेतमजुरी यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतांना तीन अपत्यांच्या संगोपनाचीही जबाबदारी सुशीला सुरवाडेंच्या शिरावर होती. शेतात विहिर खोदण्याचे काम चालू असतांनाच पतीला हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. अशी कितीतरी वादळे येतच राहिली. धीराची सुशिलाताई मात्र पाय रोवून या वादळांशी झुंजत राहीली. आयुष्यात शेतीव्यवसायात आलेले चढउतार पाहून शेतीला उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत बनवण्याचा दृष्टिकोन त्यांनी कायम जपला आहे.
 
'शेती म्हणलं कि संकटेही येणारच, मात्र त्यावर मात करता येते आणि ती ताकद मातीच देते’यावर सुशीला यांचा ठाम विश्वास. त्यातूनच त्या प्रत्येक वादळावर मात करीत गेल्या, यासाठी त्यांनी शेती सोबत शेतीपूरक व्यवसाय हे सूत्र वापरले. 1987 मध्ये अरुण सुरवाडेंशी विवाह झाल्यानंतर सहा एकर कोरडवाहू शेतीत राबणे हा त्यांच्या जगण्याचा भाग झाला. त्यातून फारसे उत्पन्न मिळत नव्हते म्हणून मजुरीवर घरखर्च चालवावा लागत होता. 


दरम्यानच्या काळात दोन मुले आणि एक मुलगी अशी तीन अपत्ये त्यांना झाली. कुटुंबाचा संघर्ष चालू होता.कोरडवाहू जमीन बागायती  करण्याचे स्वप्न त्यांच्या डोळ्यात होते. पाण्यासाठी शेतात विहिर खोदाईचे काम चालू होते, अशातच अचानक पतीच्या छातीत कळ उठली. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. दु:खाचा डोंगर कोसळला होता. समोर अनेक आव्हाने होती. खचून चालणार नव्हते. तिन्ही मुलांचं शिक्षण,शेती आणि  विहिरीसाठी घेतलेले साडे सात लाखाचे कर्ज, घरखर्च यासाठी धडपड करणे भाग होते.


शेती हाच एकमेव पर्याय समोर होता. दु:खाचा कड ओसरल्यानंतर त्यांनी विहिरीचे काम हाती घेऊन ते पूर्णत्वास नेले.पाण्याची सोय केल्यानंतर त्यांनी द्राक्षबागेची लागवड केली.  द्राक्षपिकातील तंत्रज्ञान त्यांनी समजून घेतले. मशागतीपासून ते फवारणीपर्यंतच्या सगळ्या कामांची सुत्रे त्यांनी हातात घेतली. प्रत्येक काम दर्जेदार करण्यावर त्यांचा भर राहिला. मोठ्या मेहनतीनंतर कोरडवाहु असलेल्या जमिनीत त्यांनी द्राक्षपीक घेऊन दाखवले.त्यातून कष्टाला फळ मिळत गेले. द्राक्षातून आलेल्या उत्पन्नातूनच त्यांनी शेतीवरील कर्ज फेडून टाकले. या प्रवासात सासू आणि सासऱ्यांनी त्यांना मोठा आधार दिला.
  
पुढे मोठा मुलगा महेंद्र याचीदेखील शेतीसाठी मदत होऊ लागली.  2010 पासून त्यांनी द्राक्ष निर्यात करण्यास सुरुवात केली. पाणीटंचाईचे आव्हान याही काळात होतेच. त्यात 2012 मध्ये आलेल्या फयान वादळानेही पिकाचे मोठेच नुकसान झाले. आधीच जमीन कोरडवाहू त्यात कोरडा दुष्काळ पडला. यामध्ये पाण्याची मुख्य अडचण त्यांना दिसू लागली कारण दिवाळीपर्यंत येणाऱ्या पावसावरच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ठरत होते. जमिनीमध्ये हातभर भेगा पडल्या. या काळात बोअरवेल करण्याचा  आणि शेततळे उभारण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून पाणी टंचाईची समस्या सोडवली.
 
अनेक चढ उतारानंतर शेतीची गाडी रुळावर येत होती. आता मुलंदेखील मोठी झाली. मुलांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सोलर ड्रायर घेतले आहे. त्यातून ते बेदाणा, कांदा प्रक्रिया उद्योगाला आकार देत आहेत. शेतीत संकटे आहेत मात्र ती भरपूर काही देऊ शकते यावर विश्वासही हवाच. या विश्वासामुळेच अनेक वादळे परतावता आली आणि घरादारालाही चांगले दिवस आल्याचे त्या कृतज्ञतेने नमूद करतात.



हेही वाचा :


Navdurga 2023 : शेतीतल्या नवदुर्गा! तिच्या कर्तृत्वाचे डोळस रूप; अडचणींवर मात करत उभारला व्यवसाय, लखमापूरच्या मोहिनी मोगल यांच्या कर्तृत्वाची कथा


Navdurga 2023 : पांग फेडले मातीचे; पतीच्या निधनानंतर परिस्थितीशी खंबीर लढाई, शेतीतल्या नवदुर्गा सुनीताताई आथरे यांची कथा 


Navdurga 2023 : शेतीतल्या नवदुर्गा...आव्हानांना आव्हान देते ती!


Navdurga 2023 : शेतीतल्या नवदुर्गा... ‘ती’चा ध्यास अभेद्य आणि उत्तुंग!