मुंबई : पारंपारिक आणि एकाच पिकाची शेती फायदेशीर ठरत नाही याची जाणीव वसुधा जाधव यांना एका टप्प्यावर झाली.  त्यांनी शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिली. त्याच्यातही जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यावर त्यांनी भर दिला.आज त्यांचे शेत म्हणजे उद्योग बनला आहे. किफायतशीर शेतीचा ध्यास घेतल्यानेच त्यांचा प्रगतीचा मार्ग सुकर होत गेला.

 

पदवीधर वसुधा आणि आर्मी फोर्स मधील सेवानिवृत्त दत्तात्रय जाधव हे पिंप्री (रौळस) येथील प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी जोडपे म्हणून आज ओळखले जातात. लग्नापूर्वी शेतीचा फारसा अनुभव नव्हता. नंतर अचानक शेतकामांची जबाबदारी आली आणि  वसुधा यांची प्रचंड धावपळ होऊ लागली. यातूनच त्यांनी मार्ग शोधायला सुरवात केली. लवकरच त्यांचे शेती-मातीशी असलेले  नाते घट्ट होत गेले.

 

जाधव कुटुंबाकडे 6 एकर जमीन वडिलोपार्जित होती. मात्र शेताला लागून असलेली अजून 2 एकर जमीन घेण्याची संधी आली आणि अडचणीच्या काळातही त्यांनी ती जमीन खरेदी केली.त्यामुळे पूर्ण कुटुंबावरच आर्थिक बोजा वाढला. त्यातून मार्ग काढण्यासाठी घरच्या शेतीत भाजीपाला पिकांचे उत्पादन घेणे ते स्वत: बाजारात नेऊन विक्री करणे ही जबाबदारी त्यांच्यावर आली. पुढची 2 वर्षे खूप मेहनत केली. याच काळात शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड द्यायचे ठरविले. 7 गाई विकत घेऊन सुरुवातही केली. दूध काढणे,सगळे आर्थिक व्यवहार सांभाळणे हेदेखील त्यांच्याकडेच आली. 2010 मध्ये हे कुटुंब द्राक्ष पिकाच्या माध्यमातून ‘सह्याद्री फार्म्स‘शी जोडले गेले. द्राक्ष पिकात चांगला अनुभव येत असताना त्यांनी द्राक्षपिकात काम वाढवले. यातूनच त्यांची द्राक्षे युरोपात निर्यात होऊ लागली. 

एका रात्रीत चित्रं बदललं


2017 साली अगदी एका दिवसावर द्राक्षबाग काढणी आली आणि वातावरण बदलले. एका रात्रीत चित्र बदलले. पुढील 3 दिवस संततधार पाऊस सुरु झाला. 3  एकराला मोठाच फटका बसला. पाऊस ओसरल्यानंतर द्राक्ष पिक बाजारात नेण्याच्या स्थितीत राहिले नव्हते. वाचलेल्या द्राक्षांचा त्यांनी बेदाणा करायचे ठरवले.सुरवातीची काही वर्षे द्राक्षांपासून बेदाणे बनविण्याची पद्धत पारंपारिक होती. मात्र मागील काही वर्षांपासून सोलर ड्रायर तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी सुरु केला आहे. यामुळे कमी खर्चात उत्तम दर्जाचा नैसर्गिक बेदाणा उत्पादन घेणे शक्य झाले आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर 


आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीतील रिस्क कमी करण्यात त्यांना यश मिळाले. शेती हा व्यवसाय आहे आणि त्यात व्यावसायिकता आणली पाहिजे हा विचार पुढे आला. द्राक्षे, बेदाणा ही आपली उत्पादने एका ब्रॅण्डने करण्याचे त्यांनी ठरवले. कोरोना काळात सगळी विक्री व्यवस्था ठप्प झाली तेव्हा त्यांनी ‘वसुंधरा’ या ब्रॅण्ड नावाने आपल्या उत्पादनांची किरकोळ विक्री नाशिक आणि मुंबई शहरात सुरु केली आहे.

 

शेतमालाचे कमी जास्त होणारे भाव बघून त्यांनी इतर पिकांमध्ये  देखील सोलर ड्रायरच्या माध्यमातून प्रयोग केले. यामध्ये कांदा आणि टोमॅटो सारख्या उत्पादनांना ते वाळवून प्रक्रिया करण्यासही त्यांनी सुरवात केली आहे. वसुधा यांची नवनवीन प्रयोगांची धडपड सतत सुरु आहे. त्यांचा प्रवास सोपा नव्हता. मात्र त्या कधीच डगमगल्या नाहीत. ‘सह्याद्री’ हे त्यांचे प्रेरणास्थान आहे. त्यांचा ध्यास अभेद्य आणि उत्तुंग आहे.

 

 


हेही वाचा :