मुंबई : पतीची नोकरी, घर, मुले असे सगळे आनंदाने चालू असतांना पतीला अचानक अर्धांगवायूने गाठले. त्यात नोकरीही गेली. शोभा जाधव यांची खरी लढाई इथून पुढे सुरु झाली. कुटुंबाचा आर्थिक कणा कोलमडल्यानंतर स्वत:च कणा बनणे, त्यासाठी शेतीकडे वळणे. घर सांभाळणे. पतीचे आजारपण सांभाळणे. मुलांचं शिक्षण पूर्ण करणे, स्वत:ला झालेल्या सर्पदंशासारख्या संकटाशीही दोन हात करणे, अशी सतत आव्हानांची मालिका शोभा यांच्या समोर होती. खचून जायचे नाही तर लढत राहायचे हा एवढा एकच पर्याय त्यांच्या समोर होता.  
 
शोभाताई यांचे माहेर बऱ्यापैकी चांगल्या आर्थिक स्थितीतले होते. तिथे कधी थेट शेतकामांशी संबंध आला नव्हता. सासरीही पतीची नोकरी होती. कुटुंबातील इतर सदस्यांसोबत त्या शेतीकामात हातभार लावत. काही दिवसानंतर पती आणि मुलांसोबत त्या निफाड कारखाना भागात राहायला गेल्या. तिथे गेल्यावर त्या घरची जबाबदारी सांभाळत. मुले शाळेत गेल्यानंतर मिळालेल्या वेळेत त्यांनी शिवणकाम शिकून घेतले. इथून पुढचा प्रवास मात्र अनेक वळणांचा ठरत गेला. कसोटी पाहणारे प्रसंग अनेकदा आले. 2002 मध्ये पती बाळकृष्ण यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि पूर्ण कुटुंबाचे व्यवस्थापनच विस्कळीत झाले. एकीकडे अंथरुणाला खिळून राहीलेल्या पतीची सर्वतोपरी काळजी घेणे, शिवणकामाच्या व्यवसायातून घर आणि दवाखान्याचा खर्च चालवणे ही कसरत त्यांना करावी लागत होती. 


बाळकृष्ण यांना तब्येतीच्या कारणास्तव नोकरी सोडावी लागली. त्यातून आलेले भविष्य निर्वाह निधीचे पैसे एवढाच काय तो त्यांना आधार होता. त्यातून वाघाड धरणाजवळ शेत जमीन घेतली. मग शेती हीच उदरनिर्वाहाचे एकमेव साधन बनली.  जमीन धरणाच्या जवळ असली तरी ती सलग सपाट नव्हती. डोंगराळ स्वरुपाची होती. शिवाय ती लोकवस्तीपासून दूर होती.  शोभाताई यांनी हिंमतीने मोठ्या कष्टाने ती जमीन लागवडीयोग्य बनवली. एकटीने न घाबरता अहोरात्र मेहनत केली. आधी सोयाबीन, टोमॅटोचे उत्पादन घेतले. नंतर द्राक्ष बाग लागवड केली. प्रत्येक टप्प्यावर चांगले व्यवस्थापन करुन द्राक्ष पिक यशस्वी करुन दाखवले.द्राक्षामध्ये गुणवत्तापूर्ण उत्पादन घेऊन त्या सह्याद्री फार्म्सच्या माध्यमातून द्राक्ष निर्यात देखील करत आहेत. 


कसोटीचा काळ


वर्ष 2011 -12 चा हा काळ मोठा कसोटीचा होता. पतीचे आजारपण, त्यातील चढ उतार हे सोबतीला होतेच. मध्येच एकदा शेतकाम करतांना त्यांना सर्पदंश झाला. वाटले सगळे संपले आता. पण त्या याही संकटातून बाहेर आल्या. पण पतीसह सगळ्यांच्या मनात भिती बसली. ही जागा सोडून पुन्हा दुसरीकडे शेत-जमीन पहायची असे ठरले. लवकरच निगडोळ भागात तशी शेत-जमीनही मिळाली. नव्या ठिकाणी पुन्हा नवी लढाई सुरु झाली. पाण्यासाठी शेततळे, बोअरवेल आणि पाईपलाईन केली. यात जवळचे सगळेच भांडवल खर्च झाले. त्यामुळे पुन्हा नव्या हंगामासाठी कर्ज काढले. नवीन द्राक्षबागेची उभारणी करतांना मंडप आणि तार बांधणीचे काम सुरु होते. मात्र मजुरांना द्यायलाही जवळ पैसे नव्हते. तेव्हा शोभाताईंनी पतीसह स्वत: चार क्विंटल तारेची बांधणी केली.


अशा आव्हानांची त्यांना आता जशी सवयच झाली होती. यानंतर मात्र द्राक्षशेतीतून चांगले उत्पादन मिळाले. त्यांच्या कष्टाला फळ आले. मुलांचं शिक्षण आणि लग्नही झालीत. घरी आलेल्या सुना  त्यांच्यादृष्टीने मुलीच होत्या. त्यामुळे सुनांच्या उच्चशिक्षणासाठी स्वत: शोभाताईंनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या स्वतंत्र करिअरच्या स्वप्नांनाही वाव दिला. आज त्यांनी हवामान बदलास पूरक  ‘आरा -15’ नवीन द्राक्ष प्रजातीची लागवड करून, सोबत सोलार ड्रायरचे देखील काम सुरू केले आहे. 


संघर्षाचा खूप मोठा पल्ला शोभाताईंनी पार केला आहे. या टप्प्यावर ‘शेती हीच खरी लक्ष्मी आहे‘ अशी शेतीमातीविषयीची कृतज्ञता आणि एक कृतार्थतेची भावना त्या मनापासून व्यक्त करतात.  त्यांचा प्रवास शेतीमातीतील अनेकांना प्रेरणा देणारा आहे.


हेही वाचा : 


Navdurga 2023 : शेतीतल्या नवदुर्गा... ‘ती’चा ध्यास अभेद्य आणि उत्तुंग!