Navdurga 2023 : आयुष्य म्हणजे अडथळ्यांची शर्यत होती. पण सुनीताताई आथरे यांनी कधीच जिद्द सोडली नाही. पतीच्या निधनानंतर परिस्थितीशी खंबीरपणे लढाई दिली. मातीवर अपरिमित श्रद्धा असलेल्या सुनीता यांनी कष्टातून मातीचेच पांग फेडले आहे. दोन्ही मुलांनीही शेतीसह शेतीपूरक व्यवसायातून प्रगती साधली आहे.  


ज्ञानदेव आथरे यांच्याशी 1988 मध्ये सुनिता यांचा विवाह झाला. एकत्र कुटुंब होते, पतीवर प्रमुख जबाबदारी होती. मात्र सगळे काही सुरळीत सुरु असतानाच अचानक ज्ञानदेव यांचे अपघाती निधन झाले. सुनीता यांच्यावर दु:खाचा पहाड कोसळला होता. मोठा मुलगा 2 वर्षाचा आणि छोटा मुलगा अवघा 9 महिन्यांचा होता. त्या अवघड काळात सासू-सासऱ्यांचा आधार होता. एकत्र कुटुंब पुढे विभक्त झाले. सुनीता यांच्या वाटणीला 4 एकर क्षेत्र आले. या क्षेत्रासोबतच 8 लाखांचे कर्जही आले. याही परिस्थितीत त्या मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत होत्या.


सन 2015 मध्ये नवीन द्राक्षबागेचे नियोजन केले. रोपे आणून त्याची लागवड केली. मात्र पाणीटंचाईने दगा दिला. विहिरीने तळ गाठला होता. खूप धडपड करुनही द्राक्ष बाग पाण्याअभावी सुकून गेली.पाण्यासाठीची लढाई तीव्र बनली होती. याच प्रयत्नांतून शेतात ‘बोअरवेल’चा पर्याय अजमावण्याचे त्यांनी ठरवले. बोअरला पाणी लागले आणि सुनिता यांच्या डोळ्यात हुरुप दाटला.


बोरवेलमुळे शेतीला पाण्याची असलेली समस्या दूर झाली. शेतीतील नुकसानीचे प्रमाण कमी होऊन या बोरवेलला पाणी लागल्यानंतर आर्थिक उत्पन्नात चांगली वाढ व्हायला लागली. लवकरच त्यांनी नवीन ट्रॅक्टर घेतला. परिस्थितीमुळे मुलांना  शेतीकडे वळावे लागले होते. पण शेतीसोबत मुलांनी शेतीपूरक व्यवसाय करावा अशी सुनिता यांची इच्छा होती. परिसरात भाजीपाल्यासाठी शेती-औषधांच्या दुकानांचा वणवा होता. मोठ्या मुलाने मार्केटमधील ही संधी ओळखून 2015  साली या क्षेत्रात उतरायचे ठरवले.


द्राक्षशेतीत वेळेचे नियोजन सर्वात महत्वाचे आहे. बऱ्याचदा वेळेवर मजूर न मिळाल्याने द्राक्ष उत्पादकांचे नुकसान होते. हीच गरज ओळखून लहान मुलाने इलेक्ट्रोस्टॅटीक मशीनच्या माध्यमातून द्राक्षशेतीत ‘सर्व्हिस प्रोव्हायडर’च्या भूमिकेतून व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं. आज त्यांची दोन्ही मुलं आपल्या व्यवसायासोबत शेतीदेखील उत्तम सांभाळत आहेत. आईनी दिलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या बळावर त्यांची  मुलं विदेशात द्राक्ष निर्यात करत आहेत. दोघी सुना या उच्चशिक्षित असून त्या शेती आणि व्यवसायाचे अर्थकारण सांभाळतात. मुलं आई बद्दल अभिमानाने सांगतात की "आम्ही आज जे आहोत ते आमच्या आईमुळेच!"


या संबंधित बातम्या वाचा :