मुंबई: खासदार नवनीत राणा यांची 12 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका झाली आहे. स्पॉन्डॅलिसिसचा त्रास सुरू असल्याने नवनीत राणा या तुरुंगातून थेट लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर आमदार रवी राणा यांचीही काहीच वेळात सुटका होणार आहे. 


राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेले अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांची सुटका करण्यात आली. तुरुंगात असतानाच त्यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. 


तुरुंगात असताना आपल्याला स्पॉन्डॅलिसिसचा त्रास असल्याचं वारंवार सांगूनही अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आला आहे. दरम्यान, त्या सध्या लीलावती रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना बाहेर सोडायचं की उपचार सुरू ठेवायचे हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.


किरीट सोमय्या नवनीत राणांच्या भेटीला
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या हे नवनीत राणांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी लीलावती रुग्णालयात पोहोचले आहेत. ज्यांना हनुमान चालीसा पठण करायचं होतं त्यांना बारा दिवस तुरुंगात जावं लागलं, हे बेशरम सरकार आहे असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. देवा, या माफिया सरकारपासून महाराष्ट्राची सुटका कर असंही ते म्हणाले. 


नवनीत राणा आणि रवी राणा यांचा मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर
नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील निवासस्थान 'मातोश्री'बाहेर 23 एप्रिल रोजी हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत या जोडप्याने ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची त्यांची योजना रद्द केली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश आर.एन.रोकडे यांनी बुधवारी राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला.


महत्त्वाच्या बातम्या: