Bhima Koregaon Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) भीमा कोरेगाव प्रकरणी जे. एन. पटेल आयोगासमोर चौकशीसाठी हजर राहिले आहेत. याप्रकरणी त्यांना आयोगानं आणि इतर पक्षांच्या वकीलांनी काही प्रश्न विचारले. त्यावेळी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना तुम्ही ओळखता का? असा प्रश्न आयोगानं त्यांना विचारला. त्यावेळी मी त्यांच्याबद्दल पेपरमध्ये वाचलंय, असं उत्तर शरद पवारांनी दिलं. तसेच, यांसारख्या अनेक प्रश्नांना शरद पवारांनी थेट उत्तरं दिली. 


प्रश्न : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तुमचं घर हे केंद्रस्थानी होत?


शरद पवारांचं उत्तर : मी केवळ कोरगाव भीमासाठी आलोय. मी त्यावेळी 16 वर्षांचा होतं. त्यामुळे इतकं जुनं मला काही आठवत नाही


प्रश्न : संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंना तुम्ही ओळखता का?


शरद पवारांचं उत्तर : मी त्यांच्याबद्दल पेपरमध्ये वाचलंय. 


प्रश्न : त्यांनी छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, वळू बुद्रुक इथं एक ट्रस्ट बनवलीय याची तुम्हाला माहितीय का?


शरद पवारांचं उत्तर : मला माहिती नाही. 


प्रश्न : भीमा कोरेगाव हिसांचाराबद्दल तुम्हाला कधी कळलं?


शरद पवारांचं उत्तर : दुसऱ्या दिवशी जेव्हा ही घटना मीडियात आली.


प्रश्न : यासंदर्भात तेव्हा तुम्ही सरकारला काही सूचना केल्यात का?


शरद पवारांचं उत्तर : जेव्हा हा आयोग तयार करण्यात आला. तेव्हा मला इथं येऊन जबाब देण्याची नोटीस आली. त्यानुसार मी माझं प्रतिज्ञापत्र सादर केलं. 


प्रश्न : या प्रकरणात एल्गार परिषदेबाबत पोलिसांनी केलेला तपास हा पोलीस खात्याला काळीमा फासणारा आहे. असं आपण मीडियात बोललात, हे खरं आहे का?


शरद पवारांचं उत्तर : एल्गार परिषदेला जी लोकं आलीही नव्हती त्यांच्यावरही केसेस दाखल झाल्यात. हे योग्य नाही. त्यामुळे मी त्याबद्दल बोललो असेन पण भीमा कोरेगावबद्दल बोललेलो नाही. या दोन्ही वेगळ्या घटना आहेत. 


काय आहे प्रकरण? 


1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला या हिंसाचाराच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक चौकशी आयोग नेमला होता. दरम्यान, भिमा कोरेगाव प्रकरणी शरद पवार यांनी हा हिंसाचार शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या वक्तव्यामुळे भडकल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे अॅड. प्रदीप गावडे यांनी या प्रकरणी पवारांची साक्ष नोंदवण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यामुळे आयोगाने शरद पवार यांना साक्ष नोंदवण्यासाठी समन्स आहे. 


भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडेंचा सहभाग आढळला नाही, पोलिसांची न्यायालयात माहिती


भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या विरोधात 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तपासामाध्ये संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सहभाग आढळला नसल्याच पोलीसांनी न्यायालयात सांगितलंय. त्याचबरोबर राज्य मानवी हक्क आयोगालाही त्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात ज्या इतर 41 आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 1 जानेवारी 2018 ला भिमा कोरेगाव या ठिकाणी झालेल्या हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडेंचा हात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केल्यानंतर तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारनं संभाजी भिडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.