Navneet Rana : एकीकडे राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला असला तरी त्यांच्या अडचणी मात्र कमी झालेल्या नाहीत. मुंबई महापालिकेचं पथक रवी राणा यांच्या खारमधील घरात दाखल झालं आहे. घराच्या आराखड्यात छेडछाड करुन बेकायदा बांधकाम केल्याचा बीएमसीला संशय आहे. मुंबई महापालिकेने रवी राणा यांना आधीच नोटीस बजावली होती. त्या नोटीसनुसार 4 मे रोजी दुपारी 12 वाजता आम्ही तुमच्या घरी तपासणी करण्यासाठी येऊ, असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता बीएमसीचं पथक रवी राणा यांच्या घरी दाखल झालं आहे.


खार परिसरात लाव्ही इमारतीच्या आठव्या मजल्यावर रवी राणा यांचा फ्लॅट आहे. रवी राणा यांनी त्यांच्या घरात मंजूर आराखड्याच्या व्यतिरिक्त काही अंतर्गत बदल केले आहे. या घराची बाल्कनी वाढवली आहे. याच वाढीव बांधकामावर मुंबई महापालिकेने आक्षेप घेतला आहे.


राणा दाम्पत्य सध्या घरी नाही. पण या घराची देखभाल करणारे सेवक असल्याने मुंबई महापालिकेच्या पथकाला घरात जाणं सोपं झालं. 9 ते 10 जणांचं हे पथक आहे. महापालिकेचे अधिकारी आता घरातील तपासणी करुन त्याचा अहवाल सादर केला जाईल. या अहवालाच्या अनुषंगाने आणखी एक नोटीस राणा दाम्पत्याला पाठवली जाईल.


मुंबई महापालिकेकडून नोटिस 


आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत रवी राणा हे दोघंही गेल्या 10 दिवसापासून तुरुंगात आहेत. त्यामुळं त्यांच्या घरी कोणीच नाही. त्यामुळं मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांच्या बंद दारावर नोटीस चिकटवली होती. मंजूर आराखड्याव्यतिरिक्त बांधकाम आणि काही नियमांच्या उल्लंघनाच्या तक्रारीवरुन मुंबई महापालिकेकडून तपासणीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. सोसायटीचे पदाधिकारी आणि उपभोक्ता म्हणून आमदार रवी  राणा यांच्या नावे ही नोटिस पाठवण्यात आली आहे. 


राणा दाम्पत्याला दिलासा, जामीन मंजूर 
राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयानं राणा दाम्पत्याला मोठा दिलासा दिला आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. तब्बल 12 दिवसांनी राणा दाम्पत्याची कोठडीतून सुटका होणार आहे. दरम्यान, राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. आमदार रवी राणा यांच्याविरोधात 17, तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात 6 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांनी राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केला होता. आज पुन्हा राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयानं त्यांना दिलासा दिला आहे. 



संबंधित बातम्या :


Navneet Rana And Ravi Rana : राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर; 12 दिवसांनी कोठडीतून सुटका