मुंबई : सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीचा तुटवडा जाणवत आहे. लस उपलब्ध नसल्यामुळे राज्यातील लसीकरण मोहिमेत अडथळा निर्माण झाला आहे. अनेक लसीकरण केंद्र लस नसल्यामुळे बंद ठेवण्यात आली आहेत. महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारकडून केला जात आहे. राज्य सरकारच्या या दाव्यांवरून केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर घणाघाती आरोप केले होते. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व आरोप फेटाळत स्पष्टीकरणही दिलं होतं. त्यानंतर केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. आता जावडेकरांनी केलेला दावा फेटाळून लावत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 


केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या पत्रानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. केंद्र सरकारने महाराष्ट्राला केवळ साडे सात लाख कोरोना लसीचे डोस दिले आहेत. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा इत्यादी राज्यांना महाराष्ट्रापेक्षा जास्त लस देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. तसेच महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असताना लसीचे फक्त साडेसात लाख डोस का? असा प्रश्न विचारात लसीअभावी काही जिल्ह्यात लसीकरण बंद होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. 


पाहा व्हिडीओ : Vaccine Shortage : लस घ्यायचीय, पण मिळणार कुठे? लसीवरून राजकारण, सामान्यांचं मरण | स्पेशल रिपोर्ट



राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसींचा पुरवठा कमी असल्याची तक्रार करत महाराष्ट्रासोबत दुजाभाव होत असल्याचा आरोपही या पत्रकार परिषदेत बोलताना केला होता. या पार्श्वभूमीवर प्रकाश जावडेकरांनी राज्याकडे आजही 5 ते 6 दिवसांचा लसींचा साठा शिल्लक असल्याचा दावा केला आहे. "महाराष्ट्र सरकारकडे आज सकाळपर्यंत 23 लाख लसीचे डोस आहेत. दिवसाला 6 लाख लावले, तरी त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्या दिवशी येतात. 3-3 दिवसांचे डोस पाईपलाईनमध्ये असतात. 23 लाख म्हणजे 5 ते 6 दिवसांचा स्टॉक आहे. आता तिथून जिल्ह्यांमध्ये ते वितरीत करणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. केंद्र सरकारकडून राज्यांच्या मागणीप्रमाणे पुरवठा दिला जातो. काल जेवढा पुरवठा असेल, त्याहून जास्त आज दिला जातो. आज जेवढा दिला, त्याहून जास्त उद्या मंजूर होईल. अशी पद्धत आहे." असं प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं.


Maharashtra Corona Vaccine Row | लस वाटपात केंद्राकडून महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय, केवळ 17 लाख 40 हजार डोसचं वाटप  


"महाराष्ट्रात 5 लाख डोस तर वाया गेले. कारण नियोजनच व्यवस्थित केलं जात नाही, एका वायलमध्ये 10 लोकांना डोस दिला जातो. त्याचं व्यवस्थित नियोजन केलं जायला हवं. राज्य सरकार आपलं काम नीट करत नाही आणि दुसऱ्यांवर दोष देत आहे. हे म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाँटे अशी स्थिती आहे. कुठेही 3 ते 4 दिवसांचा साठा नेहमी असतोच. त्यापुढे तो येतच असतो. जेवढं तुम्ही लसीकरण करता, त्यापेक्षा जास्त डोस केंद्र सरकार देत असतं.", असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले होते.  



आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं प्रकाश जावडेकरांच्या आरोपांवर उत्तर


केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचे सर्व आरोप फेटाळत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं. आरोग्यमंत्री म्हणाले की, "लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये. याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे, ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे." पुढे आणखी एक ट्वीट करत राजेश टोपे जावडेकरांना म्हणाले की, "आपल्यासारखा महाराष्ट्राचा सुपुत्र राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही, याची दक्षता घेईल ही माफक अपेक्षा."


महत्त्वाच्या इतर बातम्या :