मुंबई : केंद्र सरकारने महाराष्ट्राला केवळ साडे सात लाख कोरोना लसीचे डोस दिले आहेत. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा इत्यादी राज्यांना महाराष्ट्रापेक्षा जास्त लस देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली. तसंच महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असताना लसीचे फक्त साडेसात लाख डोस का? असा प्रश्न विचारात लसीअभावी काही जिल्ह्यात लसीकरण बंद होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.


कोरोना लसीच्या कमी पुरवठ्यावरुन राजेश टोपे म्हणाले की, "महाराष्ट्राला केवळ साडे सात लाख डोस दिल्यानंतर मी तातडीने केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी बातचीत केलं. तसंच शरद पवार यांनीही त्यांच्याशी चर्चा केली. मी त्यांच्याकडे या दुजाभावाचा उल्लेख केला. 12 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या, पॉझिटिव्हिटी दर आणि मृत्यू दर सर्वाधिक असताना कोरोना लसीचे डोस एवढे कमी का दिले, अशी विचारणाही हर्ष वर्धन यांना केली."




 

लवकरच दुरुस्ती केली जाईल, असं आश्वासन हर्ष वर्धन यांनी दिल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. "आम्ही अजूनही वाट पाहत आहोत. आम्हाला दर महिन्याला 1.6 कोटी तर आठवड्याला 40 लाख लसीच्या डोसची आवश्यकता आहे, जेणेकरुन दिवसाला सहा लाख लसीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण करता येईल, असं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना सांगितल्याचं राजेश टोपे म्हणाले.

गुजरातची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा निम्मी आहे. परंतु गुजरातला आतापर्यंत एक कोटी लस मिळाल्या आहेत. तर त्या तुलनेत महाराष्ट्राला कमी डोस मिळाले आहेत. आम्हाला दर आठवड्याला किमान 40 लाख डोस हवे आहेत. इतर देशांना कोरोना लसीचा पुरवठा करण्यापेक्षा आपल्या राज्यांना त्याचा पुरवठा करावा. केंद्र सरकार आम्हाला मदत करत आहे. पण ज्या पद्धतीने मदत व्हायला हवी तशी होत नाही, असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं. 


पंतप्रधानांसमोर चार प्रमुख विषय मांडणार : राजेश टोपे 
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत आम्ही चार महत्त्वाचे विषय मांडणार आहोत. हे विषय म्हणजे रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा आणि दर नियंत्रण, शेजारील राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा, कोरोना लसीचे डोस आणि व्हेंटिलेटर हे प्रमुख मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडणार आहोत, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.


केंद्राने लसीचे डोस वाढवले : राजेश टोपे  
नुकतंच मला केंद्राकडून माहिती मिळाली आहे की, कोरोना लसीचे डोस सात लाखांवरुन 17 लाखांवर वाढवण्यात आले आहेत. तरीही हे डोस कमी आहेत, कारण आम्हाला आठवड्याला 40 लाख डोसची गरज आहे. त्यामुळ 17 लाख डोस पुरेसे नाहीत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.


भाजपशासित राज्यांना जास्तीचा लस साठा
भाजप सरकार असलेल्या राज्यांना जास्तीचा लस साठा देण्यात आल्याचं समोर आलं आहे. उत्तर प्रदेशला 44 लाख डोस, मध्य प्रदेशला 33 लाख डोस, गुजरातला 16 लाख लस, 
कर्नाटक 23 लाख डोस, हरियाणा 24 लाख डोस, झारखंड 20 लाख डोस केंद्राने दिले आहेत.


संबंधित बातम्या


केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक, लोकसंख्या आणि कोरोना रुग्णांच्या तुलनेत गुजरातला जास्त लस पुरवठा


CoronaVaccine | कोरोनाच्या लस वाटपात राजकारण होतंय का?


Maharashtra Corona Vaccination: कोरोना लसीकरणावरुन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांचे महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप


लसीकरणावरुन हर्ष वर्धन यांचे महाराष्ट्रावर गंभीर आरोप; सत्यजीत तांबेंची टीका तर सुप्रिया सुळेंकडून लसीकरण परिस्थितीचा दाखला