नाशिक : आरटीओमधील कथित भ्रष्टाचाराप्रकरणी नाशिक पोलिसांनी तब्बल 5,300 पानी अहवाल पोलीस महासंचालकांकडे सादर केला आहे. त्यामध्ये एकूण 86 जणांचे जबाब नाशिक गुन्हे शाखेने नोंदवले असून यात आरटीओशी संबंधित 79  अधिकारी आणि कर्मचारी, एक पोलीस अधिकारी आणि 6 इतर लोकांचा समावेश आहे. निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी 16 मे 2021 रोजी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.


आरटीओमधील कथित भ्रष्टाचाराप्रकरणी नाशिकमध्ये कोणताच गुन्हा घडला नसल्याचं सांगत पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिवहन मंत्री अनिल परब यांना क्लिन चीट दिली आहे. नाशिक पोलिसांच्या या दाव्याने आपल्याला धक्का बसला असल्याचं निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी सांगितलं आहे. गजेंद्र पाटील यांनी 16 मे 2021 रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता आणि त्यामध्ये त्यांनी आरटीओ विभागातील बदल्या, अधिकाऱ्यांच्या कामकाजातील अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार या संदर्भात तक्रार केली होती. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही त्यांनी आरोप केले होते.


नाशिकमध्ये गुन्हे घडल्याचे पुरावे देऊन ही नाशिकमध्ये गुन्हा दाखल नाही असे निष्पन्न होणे धक्कादायक असल्याचं मत गजेंद्र पाटील यांनी व्यक्त केलंय. सुरवातीला हे प्रकरण गंभीर आहे, याची व्याप्ती मोठी आहे असा दावा पोलीस करत होते. मग आता निष्पन्न काहीच का नाही असा सवालही त्यांनी केला आहे. 


नाशिक पोलिसांच्या या चौकशीनंतर बोलताना गजेंद्र पाटील म्हणाले की, चौकशी समितीने 45 दिवस चौकशी केली. माझ्याकडे असलेले पुरावे मी पाच दिवस चाललेल्या चौकशीत सादर केले होते. माझी रीट पिटीशन न्यायालयात दाखल आहे. मी 16 मे 2021 रोजी पंचवटी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्यावर सुरुवातीला कारवाई झाली नाही. त्यामुळे  मी उच्च न्यायालात रिट पिटीशन दाखल केली. 


गजेंद्र पाटील पुढे म्हणाले की, नंतर चौकशी समिती स्थापन केली. आता 45 दिवसात गुन्हे झाले नाहीत हे म्हणणं धक्कादायक आहे. मी पुरावे दिले, त्यात अनेकांचे नाव होतं. पण त्या पुराव्यांच काय झाल माहिती नाही. मी दिलेल्या पुराव्यांची राज्यभर व्याप्ती, त्यामुळंच शासनाचे अधिकारी, मंत्री त्याला जबाबदार आहेत. अनिल परब यांच्या विरोधात पुरावे दिले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. 


गजेंद्र पाटील म्हणाले की, मी ज्यांच्यावर आरोप केले त्या तडवी यांना शासन पाठीशी घालत आहे. प्रशासनात प्रामाणिकपणे काम करत असताना समाजकंटकांकडून अधिकाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न होतो. तो माझ्याबाबत झाला. माझ्या विरोधात देखील अनेक आरोप झाले, तक्रारी झाल्या. पण मी सगळ्यातून निर्दोष सुटलो.


पोलिसांच्या चौकशी अहवालावर मी समाधानी नाही. मी न्यायालयीन लढाई सुरु केली असून न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत माझी लढाई सुरुच राहणार असंही गजेंद्र पाटील म्हणाले. 


निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. परंतु, त्यांची तक्रार ही केवळ नाशिकपुरतीच मर्यादित नसून ही संपूर्ण राज्यातील आरटीओच्या इतर विभागांमध्येही अशाच स्वरुपाचे गैरव्यवहार झालेत, अशी त्यांची तक्रार होती. नाशिकमध्ये असा गुन्हा घडला नाही, परंतु, राज्यांतील इतर आरटीओ विभागांत काय घडलं आहे? याचा संपूर्ण अहवाल नाशिक पोलिसांनी पोलीस महासंचालकांकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे नाशकात क्लिन चीट मिळाली असली तरी राज्यांतील इतर विभागांत काय घडलंय हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु, तुर्तास तरी या प्रकरणी नाशकात काहीच घडलं नसल्यानं परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 


महत्वाच्या बातम्या :