पालघर : पालघर जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे दहा रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी उपचार घेत असताना पाच जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. तर तीन जण यातून पूर्ण बरे झाले आहेत. तर एकाला उपचारासाठी जिल्ह्याबाहेर पाठविण्यात आले आहे. सध्यस्थीतीत जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा एक रुग्ण उपचार घेत आहे. पालघर ग्रामीण भागात एकही रुग्ण नाही. दगावलेले पाचही रुग्ण वसई तालुक्यातील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.


पालघर जिल्हाशल्यचिकित्सक कार्यालयाने या रुग्णांच्या आकड्याची माहिती दिली असली तरी मूळचे पालघर जिल्ह्यातील पण जिल्ह्याबाहेर उपचार घेत असलेल्यांची आकडेवारी त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याने या रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्व कोरोना उपचार केंद्रांमध्ये व्याधी असलेल्या आणि म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळणाऱ्या बाधित रुग्णांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या आरोग्य संस्थांमधून अनेक रुग्णांना तपासले गेले आहे. त्यातील कोणालाही अजूनही म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळली नसल्याचे म्हटले गेले आहे.


आरोग्य विभागाने यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे. ज्या करोना बाधित रुग्णांना दहा दिवसांहून अधिक काळ प्राणवायुवर ठेवले गेले आहेत असे रुग्ण, मधुमेही करोना बाधित रुग्ण, अवयवांचे विकार असलेले रुग्ण, डायलिसिसवर असलेले रुग्ण यांची पहिल्या टप्प्यात म्युकरमायकोसिसची तपासणी करण्याच्या सूचना दिल्याने प्राथमिक टप्प्यावर रुग्ण आढळला तर त्याला उपचार देणे सोयीचे जाणार आहे. म्हणून या तपासणी करण्यात येत आहेत. या व्याधींसोबत ज्या रुग्णांना डोळे दुखणे, डोळ्यांतून पाणी गळणे, अर्ध चेहरा दुखणे, नाकातून सतत पाणी वाहणे अशी लक्षणे आढळत आहेत अशांचीही तपासणी करण्यात येत आहे.


या बुरशीजन्य आजारावर लागणारी औषधे महागडी असल्याने जिल्हा प्रशासनामार्फत त्यांचे नियोजन करण्यात येत आहे. आतापर्यंत सोळा रुग्णांना बुरशी प्रतिबंधात्मक इंजेक्शन (ऍम्पोट्रीझीम-बी) देण्यात आली आहेत. तर पुढे जाऊन या इंजेक्शनचा तुटवडा जाणवू नये यासाठी जिल्ह्याकडे पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले आहे. जिल्ह्याबाहेरील रुग्णांनाही आवश्यक कागदपत्रे पडताळून इंजेक्शन देण्यात आली आहेत. 


म्युकरमायकोसिसची प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात खबरदारी घेण्यात आली आहे. रुग्ण तपासणी व निदान तसेच तातडीचे उपचार करण्याच्या सुचना उपचार केंद्रांना दिल्या असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर यांनी सांगितलं.


म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा काळाबाजार?


पालघर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे काहींकडून सांगण्यात येत आहे. काळाबाजार करणारे काही दलाल सक्रिय आहेत असे समजते. या इंजेक्शनचा काळाबाजारी करणाऱ्या अशाच दोघांना ठाणे पोलिसांनी वसई येथून धरपकड केली आहे. त्यांनी बोईसर येथून हे इंजेक्शन घेतल्याची कबुली दिल्याचे सुत्रांमार्फत सांगितले जात आहे.