मुंबई : राज्यातील आशा वर्कर्स (Accredited Social Health Activist) चा संप अखेर मिटला आहे. गेल्या दोन दिवसांपासून आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेला यश आलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. कोरोना काळात सेवाभत्ता वाढवून मिळावा, या मागणीसाठी आशा वर्कर्स संपावर गेलेल्या होत्या. याशिवाय त्यांच्या इतरही काही मागण्या होत्या. पण अखेर हा संप मिटलेला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
योग्य मानधन, आरोग्य सुविधा, विमा योजना यांसारख्या विविध सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यातील आशा वर्कर्स संपावर गेल्या होत्या. या संपात राज्यातील 72 हजारांहून अधिक आशा वर्कर्स संपावर गेल्या होत्या. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आमचा संप सुरुच राहिल, असा निर्णय आशा वर्कर्सनी घेतला होता. यानुसार राज्यातील 72 हजारांहून अधिक आशा वर्कर कामावर न जाता घरी बसून हा संप करत होत्या. वारंवार सांगूनही सरकार अजिबात आशा वर्कर्सबाबत गंभीर दखल घेत नाही. कोरोना काळात कामे करुनही त्यांना कमी मानधन दिले जात आहे, अशा अनेक मागण्यांसाठी राज्यभरातील आशा वर्कर्सनी एकत्र येत संप पुकारला होता.
राज्यभरातील आशा वर्कर्सनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये चर्चा सुरु होत्या. आशा वर्कर्सचा संप पुकारल्यापासून आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये तीन बैठका झाल्या. या बैठकांमध्ये चर्चेच्या अंती निर्णय झाला. एक जुलैपासून निश्चित मानधनात वाढ करुन एक हजार रुपये केलं जाणार असल्याची हमी आशा वर्कर्सना देण्यात आल्यामुळे त्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच आशा वर्कर्सना 500 रुपये कोविड भत्ता देण्यात येणार आहे. म्हणजेच, एकूण 1500 रुपये एक जुलैपासून आशा वर्कर्सना देण्यात येणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
आशा वर्कर्सना मिळणाऱ्या सुविधा :
- एक हजार रुपयांच्या निश्चित मानधनासोबतच 500 रुपयांचा कोविड भत्ता मिळणार, म्हणजेच, एकूण 1500 रुपये एक जुलैपासून आशा वर्कर्सना देण्यात येणार
- आता सध्या लसीकरण मोहीम सुरु आहे, त्यासाठी लसी देणाऱ्या आशा वर्कर्सना 200 रुपये अतिरिक्त भत्ता देणार
- अनेकदा काम करताना आशा वर्कर्सवर हल्ला होतो, याबाबत पोलीस विभागाला कडक कारवाईच्या सूचना देण्यात येतील
- कर्तव्य बजावताना ज्या आशा वर्कर्सचा मृत्यू झाला त्यांना पन्नास लाख रुपये देणं निश्चित झालं आहे.
- आशा वर्कर्स आणि त्यांच्या कुटुंबियांची नावं अंतर्भूत करुन त्यांना कोविड शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा देण्यात येईल
- मागच्या सरकारने मान्य केलेले 2000 प्रति महावाढ मान्य करून अंमलबजावणी लवकरच केली जाईल
महत्त्वाच्या इतर बातम्या :