Nashik News : गेल्या दोन दिवसांपासून नाशिकला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. अशातच सिन्नर (sinner) तालुक्यात सायंकाळी जनावरांसाठी शेतात चारा आणायला गेलेल्या शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला असून यामुळे तालुक्यावर शोककळा पसरली आहे. तर त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwer) वीज स्पर्शून गेल्याने एक महिला जखमी देखील झाली आहे. 


गेल्या चार दिवसांपासून नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच काल झालेल्या अवकाळी पावसामुळे सिन्नर तालुक्यात वीज कोसळून बाळू गीते (Balu Gite) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दुसरीकडे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे पिंपळद-ब्राम्हणवाडे रस्त्यावरील सावरवाडी येथे झाडावर वीज पडून झाडा शेजारी उभ्या असलेल्या तानुबाई पुंडलिक पोटिंदे यांच्या अंगावर झाडावरून वीज आल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या होत्या, त्यांना त्र्यंबकेश्वर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येऊन करून घरी पाठवले. 


त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील पिंपळद-ब्राम्हणवाडे रस्त्यावरील सावरवाडी रस्त्यावर घटना घडली. सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. याचबरोबर विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट देखील सुरू होता. अशातच सावरवाडीत राहणाऱ्या तान्हाबाई पुंडलिक पोटिंदे या 65 वर्षीय महिला घराबाहेर पडल्या होत्या. याचवेळी बाजूच्या झाडावर वीज कोसळली. या महिलेला देखील विजेचा स्पर्श जाणवल्याने ती बेशुद्ध पडली. तात्काळ कुटुंबीयांनी नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करत उपचार केल्यांनतर सद्यस्थितीत महिला सुखरुप आहे. 


तान्हाबाई पुंडलिक पोटिंदे या त्यांच्या पिंपळद शिवारातील शेतात होत्या. सायंकाळी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) सुरु झाल्याने लाकडे भीजू नये म्हणून त्या गोळा करून झाकण्यासाठी घराबाहेर असलेल्या शेतामध्येच आल्या. त्याचक्षणी वीज कडाडली, आणि थेट शेतातील आंब्याच्या झाडावर कोसळली. यावेळी आजीबाईच्या विजेचा स्पर्श जाणवल्याने डोक्यावरील केस अंगावरील लुगडे जळाल्याचे समजते. या दुर्घटनेत त्या बेशुद्ध झाल्या. आपली आई बेशुद्ध झाल्याचे पाहून मुलगा सोनू याने तात्काळ त्र्यंबकेश्वर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्यामुळे तान्ह्याबाई यांची प्रकृती आता स्थिर असून अधिक त्रास जाणवल्यास उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात येईल असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. तान्ह्याबाई या मृत्यूच्या दाढेतून परत आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी आभार मानले आहे.


जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा


नाशिकसह जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसत असून सुलतानी सोबतच अस्मानी संकटाचा सध्या बळीराजाला सामना करावा लागत आहे. यामुळे गहू, द्राक्ष, कांदा, हरभरा या पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सायंकाळचे नितीन गडकरींसोबतचे आपले नियोजित कार्यक्रम रद्द करत निफाड तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचल्या होत्या. कुंभारी गावात गारपीटीमुळे झालेल्या द्राक्षबागांच्या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांची चर्चा करत कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या त्यांनी सूचना केल्या आहेत.