CM Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आज रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील खेडमध्ये (Khed) जाहीर सभा होणार आहे. आज सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी या सभेचं आयोजन केलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी खेडमध्ये केलेल्या टिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.


दरम्यान, ज्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती त्याच मैदानात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सभेत एकनाथ शिंदेंसह त्यांच्याबरोबर गेलेल्या 40 अमदारांवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या टिकेनंतर शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती.


खेडच्या सभेत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?


ज्यांना जे शक्य होतं ते दिलं, पण ते आता खोक्यात बंद झाले आहेत अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. आज माझे हात रिकामे आहेत, मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. आज मी तुमच्याकडे मागायला आलोय. तुमची सोबत मला हवी आहे. जे भुरटे चोर, गद्दार आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की, तुम्ही शिवसेना हे नाव चोरू शकाल, पण शिवसेना चोरू शकणार नाही. जिथे रावण आपटला तिथे मिंधे गटाचं काय? असा खोचक टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला होता.


मी घरात राहुन जो महाराष्ट्र सांभाळला तो तुम्ही घरोघरी, अगदी गुवाहाटीला फिरुन सांभाळु शकत नाही. दिल्लीत मुजरे मारायला जाण्यात तुमचं अर्ध आयुष्य जात आहे. ज्याना मंत्रीपद दिली नाहीत त्यांना सांभाळताना उरलेल जातंय. सगळे उद्योगधंदे गुजरातला जात होते. कारण गुजरातला निवडणुका होत्या, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार कधी ऐकलेही नाहीत ते आम्हांला बाळासाहेबांचे विचार शिकवणार? काय आहेत बाळासाहेबांचे विचार? नोकर्‍या जाऊ द्या हे विचार नव्हते, भूमीपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी लढणार्‍या शिवसेनेचा विजय असो हा विचार घेऊन शिवसेनेची स्थापना झाली असल्याचे ठाकरे म्हणाले होते. दरम्यान आज उद्धव ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार याकडं सर्वांचं लक्ष लागले आहे.