राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेतील मराठा मंत्री तोंडात गुटखा खाऊन बसलेत का? : नरेंद्र पाटील
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत आज सोलापूरमध्ये मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर नरेंद्र पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मराठा मंत्र्यांवर निशाणा साधला.
सोलापूर : ओबीसी समाजाचे नेते आरक्षणाच्या मुद्यावर एकत्र येतात. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेतील मराठा मंत्री मात्र तोंडात गुटखा खाऊन बसलेत का? अशी टीका मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांनी केलीय. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत आज सोलापूरमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर नरेंद्र पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मराठा मंत्र्यांवर निशाणा साधला.
"ओबीसी समाजाचे नेते हे त्यांचे राजकीय आरक्षण किंवा पदोन्नतीमध्ये आरक्षण अडचणीत आल्यानंतर एकत्रित येतात. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील मराठा मंत्री मात्र तोंडात गुटखा खाऊन बसलेत का? अशी गंभीर टीका नरेंद्र पाटील यांनी केली. या मंत्र्यांना लाजा वाटत नाही का? नाहीतर किमान आम्ही मराठा नाहीत हे तरी जाहीर करा" असेही नरेंद्र पाटील यावेळी म्हणाले. दरम्यान मराठा क्रांती संघर्ष मोर्चा हा आक्रमक असेल अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली.
''घरात बसून, काळे झेंडे दाखवून आंदोलन करायचे नाहीत. हे असे मिळमिळीत आंदोलन मराठ्यांचे नाहीत. एखाद्या मंत्र्याची गाडी आली तर दगड घालून त्याची काच फोडली पाहिजे." असे विधान नरेंद्र पाटील यांनी केले. सोलापुरात पार पडलेल्या या बैठकीसाठी माजी सहकारमंत्री भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी हजेरी लावली. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी तरुणांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान इत्यादींना पत्र लिहावे असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले. तसेच आरक्षणाच्या बाबतीत सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून मराठा समाजाच्या बाजूने उभे राहायला हवे असे मतही आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.
दरम्यान नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, अशी भूमिका नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. नवी मुंबई, पनवेल, उरण या भागात एकाही मोठ्या प्रकल्पाला स्थानिक व्यक्तीचे नाव देण्यात आले नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांच्यापेक्षा मोठे नाव कुणाचे होऊ शकत नाही. त्यामुळे स्थानिकांची मागणी रास्त असून शासनाने देखील याचा विचार करावा असे मत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.