एक्स्प्लोर
विधीमंडळाबाहेर पाणी तुबलं, नाल्यांमध्ये दारुच्या बाटल्यांचा खच
विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे स्वत: या ठिकाणी उपस्थित राहून कामावर देखरेख करत होते.

नागपूर : नागपूरमधील मुसळधार पावसाचा फटका विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनालाही बसला आहे. महाराष्ट्राच्या विधीमंडळात वीजपुरवठा खंडित केल्याने इतिहासात पहिल्यांदाच वीज गेल्याने विधीमंडळाचं कामकाज ठप्प झालं आहे. परंतु विधीमंडळाबाहेर पाणी साचण्यामागचं प्रमुख कारण आता समोर आलं आहे. विधानभवन परिसरात पाण्याचा निचरा होणाऱ्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बाटल्यांचा खच साचला होता. सुरुवातीला नाला काठोकाठ भरलेला होता. त्यामधूनच पाण्याचा निचरा होत होता. परंतु गटाराचं पुढचं झाकणं उघडलं असता पाणी साचण्याचं कारण समोर आलं. इथे दारुच्या बाटल्या तसंच प्लास्टिकच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच होता. कर्मचाऱ्यांनी या बाटल्या आणि पिशव्या बाजूला केल्यानंतर पाण्याचा निचरा व्हायला सुरुवात झाली. विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे स्वत: या ठिकाणी उपस्थित राहून कामावर देखरेख करत होते. मात्र अतिशय कडेकोट सुरक्षा असताना विधीमंडळ परिसरात दारुच्या बाटल्या कशा आल्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनेची प्रतिक्रिया विधानसभेचं कामकाज 10 वाजता सुरु झालं. मात्र वीज नसल्याने अंधारातच कामकाज सुरु झालं. विरोधकांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात सरकारविरोधात निदर्शने केली. नागपुरात रस्त्यांरस्त्यात पाणी आहे. आमदारांना विधीमंडळात पोहोचण्यासाठी 2-2 तास लागले. हाच प्रकार मुंबईत झाला असता, तर मुंबई महापालिकेबद्दल लोकांनी आक्षेप घेतला असता. आज नागपुरात हा प्रकार घडला. नागपूर उपराजधानी आहे. नागपूरमध्ये अधिवेशन असताना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विधीमंडळ सभागृहात वीजपुरवठा करताना शॉर्ट सर्किट होतंय, रस्ते भरले आहेत, मग नागपूर महापालिका काय करते, असा सवाल शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी उपस्थित केला. मुंडेंचंही सरकारवर टीकास्त्र नागपुरातील या परिस्थितीवरुन शिवसेनेने नागपूर महापालिका आणि प्रशासन म्हणजेच भाजपवर तुफान टीकास्त्र सोडलं.तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारला धारेवर धरलं. अडीच तास पाऊस पडल्यानंतर जर व्यवस्था कोसळत असेल, तर हे सरकार महाराष्ट्र काय सांभाळणार असा सवाल धनंजय मुंडे यांनी विचारला. ऊर्जामंत्र्यांची प्रतिक्रिया दरम्यान, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुठेही वीज गेली नसल्याचा दावा केला. पावसाने पाणी साचलं आहे. विधानभवनाचं स्वीचिंग सेंटर खाली आहे. पावसाचं पाणी आतमध्ये आल्याने स्वीचिंग सेंटर बंद करावं लागणार आहे. पाणी ओसरत नाही तोपर्यंत वीज बंद करावी लागणार आहे. लाईट कुठेही गेली नाही, केवळ स्वीचिंग सेंटरमुळे बंद केली, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. अजित पवार यांची प्रतिक्रिया या सरकारच्या हट्टीपणामुळे ही परिस्थिती आली आहे.आज आम्ही सकाळपासून विधीमंडळात आहे. कुठेही लाईट नाही. लॉबीमध्ये अंधार झाला आहे. इथं अधिवेशन घेत असताना, जी पूर्वतयारी करायला हवी, जी काळजी घ्यायला हवी, ती घेतलेली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी केला.
आणखी वाचा























