एक्स्प्लोर
Advertisement
नागपुरात 48 तासात गँगरेपच्या दोन घटना, तडीपार गुंड आरोपी
पोलिसांच्या दुर्लक्षामुळे तडीपार गुंड शहरात राहून गंभीर गुन्हे करत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
नागपूर : व्हीव्हीआयपींचे शहर मानल्या जाणाऱ्या नागपुरात 48 तासात सामूहिक बलात्काराच्या दोन घटना घडल्यामुळे खळबळ माजली आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे एमआयडीसी परिसरात 19 वर्षीय तरुणीसोबत घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाचा मुख्य आरोपी नागपुरातून तडीपार करण्यात आलेला गुंड आहे.
पोलिसांच्या दुर्लक्षामुळे तडीपार गुंड शहरात राहून गंभीर गुन्हे करत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. संतप्त महिलांनी तर स्वसंरक्षणासाठी हत्यार ठेवण्याची परवानगी पोलिसांनी द्यावी, अशी मागणी केली आहे.
गेले दोन दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरात होते. शहरात विविध सार्वजनिक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती होती. त्यामुळे या काळात नागपुरात सुरक्षाव्यवस्था चोख असेल, असा सर्वांचा समज असू शकतो, मात्र गेल्या तीन दिवसात घडलेल्या घटना पाहायला हव्यात.
16 मार्च - यशोधरानगर भागात रेल्वेलाईनजवळ रात्री दहा वाजता एका 17 वर्षीय तरुणीवर दोन गुन्हेगारांनी सामूहिक बलात्कार केला. पीडित तरुणी मध्यप्रदेशहून नागपुरात आपल्या भावाकडे आली होती. त्यावेळी तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन सीताबर्डी परिसरातून दोन गुंडांनी तिला यशोधरानगर परिसरात नेऊन गँगरेप केला.
17 मार्च - पारशिवनी तालुक्यात शिंगोरी बस स्टॉपजवळ सकाळी साडेनऊ वाजता रत्नमाला रांगणकर या 22 वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून हत्या केली गेली.
17 मार्च - सीताबर्डी परिसरात संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास 19 वर्षीय तरुणी आपल्या ऑटोचालक मित्रासोबत ऑटोतून जात होती. वाटेत बाईकवर आलेल्या अखिलेश वांद्रे आणि रितेश गवई या दोन गुंडानी त्यांना अडवलं. पीडित तरुणीला तिच्या एका मैत्रिणीबद्दल विचारलं. पीडितेने ती कुठे आहे, हे माहित नसल्याचे सांगितल्यावर संतापलेल्या गुंडांनी चाकूच्या धाकावर आम्हाला तिचं घर दाखव, असं म्हणत तरुणीला बळजबरीने सोबत नेलं.
तरुणीच्या घाबरलेल्या मित्राने काही अंतरापर्यंत ऑटोने त्यांचा पाठलाग केला. मात्र एका ठिकाणी अंधाराचा फायदा घेत दोन्ही गुंडांनी ऑटोचालक मित्राला चाकूचा धाक दाखवत पळवून लावलं. तरुणीला एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एसआरपी कॅम्पमागे एका निर्माणाधीन इमारतीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
आरोपींनी आपला सहकारी शुभम निंबूलकरला तिथेच दारु आणि बिर्याणी घेऊन बोलावलं. त्यानंतर तिघांनी निर्माणाधीन इमारतीत पाचव्या मजल्यावर रात्री दहा वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत वारंवार अतिप्रसंग केला. पहाटे तिला त्याच अवस्थेत वैशालीनगरमध्ये निर्जन ठिकाणी सोडून पळ काढला. एका महिलेच्या मदतीने पीडित तरुणीने पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली.
धक्कादायक बाब म्हणजे या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा प्रमुख आरोपी अखिलेश वांद्रे सराईत गुंड असल्याने काही महिन्यांपूर्वी त्याला नागपुरातून हद्दपार करण्यात आलं आहे. मात्र तो तेव्हापासून नागपुरातच राहत असून डिसेंबर महिन्यात त्याने अजनी परिसरात एकावर चाकू हल्ला केला होता.
सामूहिक बलात्कार प्रकरणातील इतर आरोपीही सराईत गुन्हेगार आहेत. त्यामुळे तडीपार गुंड आपल्या सहकाऱ्यांसोबत शहरात राहून सामूहिक बलात्कारासारखं कृत्य करत असताना नागपूर पोलिस झोपले होते का सा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांनी शहरात एकानंतर एक सुरु असलेल्या घटनांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून मुख्यमंत्र्यांच्या गावात महिला सुरक्षित का नाही? असा सवाल विचारला जात आहे.
काही महिलांनी तर आम्हालाच हत्यार सोबत ठेवण्याची परवानगी पोलिसांनी द्यावी, अशी मागणी केली आहे. पोलिस गुंडांचा बंदोबस्त करु शकत नसतील, तर आम्ही कायदा हातात घेऊ, अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे.
नागपूर पोलिस महिला सुरक्षेच्या नावाखाली अनेक योजना राबवतं. महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथकांचीही रचना करण्यात आली आहे. मात्र जर गुंड शहराच्या प्रमुख रस्त्यातून तरुणींना उचलून त्यांच्यावर अत्याचार करत असतील, तर नागपूर पोलिसांनी त्यांच्या कार्यपद्धतीचा आणि कार्यक्षमतेचा पुन्हा विचार करण्याची वेळ आली आहे, असंच म्हणावं लागेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement