एक्स्प्लोर
नागपुरात तस्करांचीच पोलिसांवर हायटेक पाळत
नागपूर जिल्ह्यात सध्या तस्करांनी चार विभागांच्या अधिकाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे. तस्करांच्या या हायटेक हेरगिरीचे एक्स्क्लुझिव्ह पुरावे 'एबीपी माझा'च्या हाती लागले आहेत.

नागपूर : सरकारी अधिकारी आणि त्यांच्या यंत्रणेकडून तस्कर आणि अवैध कारभार करणाऱ्यावर नजर ठेवली जाते, अशी अनेक प्रकरणं आपण ऐकली आहेत. मात्र जर तस्करच सरकारी अधिकाऱ्यांवर, त्यांच्या कार्यालयांवर पाळत ठेवून अवैध धंदे चालवत असतील तर काय म्हणणार! नागपूर जिल्ह्यात सध्या तस्करांनी अशाच पद्धतीने चार विभागांच्या अधिकाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे. तस्करांच्या या हायटेक हेरगिरीचे एक्स्क्लुझिव्ह पुरावे 'एबीपी माझा'च्या हाती लागले आहेत. "भाऊ मोहप्याची अपडेट द्या, तिथे कोणी आहे का"... "सावनेर रोड वर गाडी जाईल, तिकडे कोणी आहे का"... "५५९ कुठे गेली" हा संवाद पोलिसांचा नाही... तर कारवाईसाठी निघालेल्या पोलिसांवर पाळत ठेवणाऱ्या हस्तकांचा आहे. आरटीओ, महसूल, पोलिस आणि खनिजकर्म विभागाचे अधिकारी कार्यालयाच्या बाहेर निघाले, की तस्करांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हॉईस मेसेजेसचा पाऊस पडू लागतो. गाडीने अमुक चौक पार केला, गाडी सध्या तमुक रस्त्यावर आहे, अशा आशयाचे मेसेज येऊ लागतात. ओव्हरलोड, मायनिंग, सावनेर, फ्रेंड्स, रॉयल्टी असे अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप सध्या नागपूर जिल्ह्यात सक्रिय आहेत. त्याच्या माध्यमातून तस्करांचा हा खेळ सुरु आहे आणि कोट्यवधींचा शासकीय महसूल बुडवला जात आहे. तस्कर अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी बेरोजगार तरुणांचा वापर करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. अवैध धंदे करणारे पोलिसांच्याच हालचालींवर लक्ष ठेवून असल्यानं सोशल मीडियामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पोलिसांवरच गुन्हेगारांची अशी पाळत असणे अत्यंत गंभीर बाब आहे. सरकारी यंत्रणेसमोर गुन्हेगारांचं हे नेटवर्क लवकरात लवकर उद्ध्वस्त करण्याचं मोठं आव्हान आहे.
आणखी वाचा























