Chandrashekhar Bawankule: एबीपी माझाची बातमी पाहिली, बावनकुळेंनी तातडीने दखल घेतली, गडकरींच्या मदतीने झटक्यात प्रश्न मार्गी!
Chandrashekhar Bawankule: स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात एबीपी माझाच्या बातमीचा खास उल्लेख केला आणि गडकरींच्या मदतीने झटक्यात मार्गी लागल्याची एक घटना सांगितली आहे.

नागपूर : नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात एबीपी माझाच्या बातमीचा खास उल्लेख केला आणि गडकरींच्या मदतीने झटक्यात मार्गी लागल्याची एक घटना सांगितली आहे. माझाच्या बातमीमुळे आम्हाला विकसित होत असलेल्या नागपुरात एका भागात खराब रस्त्यामुळे विद्यार्थी आणि महिलांना कित्येक किलोमीटर कसं पायी प्रवास करावा लागत आहे, हे कटू वास्तव दिसून आले. ती बाब पालकमंत्री म्हणून मला आणि शासनाला शोभणारी नव्हती, म्हणून त्या बातमीनंतर आम्ही तातडीने नितीन गडकरी यांच्या विभागाच्या मदतीने 80 कोटी रुपये त्या रस्त्यासाठी मंजूर करून घेतल्याचेही बावनकुळे म्हणाले आहेत.
आज नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना बावनकुळे यांनी एबीपी माझाच्या पाचगाव, चांपा परिसरातील खराब रस्त्याच्या बातमीचा उल्लेख केला. त्याचबरोबर नितीन गडकरी यांच्या विभागाच्या मदतीने 80 कोटी रुपये त्या रस्त्यासाठी मंजूर करून घेतल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले बावनकुळे
जो पर्यंत मीडिया समाजातील प्रश्न आमच्या समोर आणत नाही, तोवर विकसित महाराष्ट्राचा स्वप्न पूर्ण होणार नाही. एबीपी माझाने पाचगावची खराब रस्त्याची बातमी दाखवली. जिथे विद्यार्थ्यांना, महिलांना वाईट रस्त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत होता, अनेक किलोमीटर पायी करावा लागत होता. विकसित होत असलेल्या नागपुरात लहान विद्यार्थ्यांना एवढे किलोमीटर खराब रस्त्यावर पायी जावे लागणे हे मला आणि सरकारला शोभणारे नव्हते. नितीन गडकरी यांच्याकडे जाऊन त्या भागासाठी 80 कोटी रुपयांचा रस्ता तातडीने मंजूर केले. ती बातमी आम्हाला कोणी दाखवली होती, तर मीडियाने दाखवली होती. अशा बातम्यांचा आम्ही नेहमीच स्वागत करू, आम्हाला अशा बातम्यांची कुठलीही नाराजी नाही, असंही पुढे बानवकुळे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय प्रकरण?
काही दिवसांपूर्वी एबीपी माझाने नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात चांपा ते खापरी दरम्यानचा रस्ता मायनिंग उद्योगांच्या शेकडोंच्या संख्येने चालणाऱ्या ट्रकमुळे खराब झाल्याचे वास्तव दाखविले होते. खराब रस्त्यामुळे एसटीने त्या मार्गावरील सेवा बंद केल्याचे आणि त्यामुळे त्या भागातील अनेक गावातील महिलांना पायी किंवा ट्रकमध्ये बसून प्रवास करण्याची पाळी आल्याचे भीषण वास्तव एबीपी माझाने समोर आणले होते. एबीपी माझाने चांपा ते खापरी दरम्यान तब्बल 22 गावांतील मुंबई लोकांना कशा पद्धतीने त्रास होत आहे, हे वास्तव दाखवल्यानंतर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या बातमीची लगेच दखल घेतली आणि प्रशासनाची बैठक घेऊन संबंधित रस्ता त्वरित बनवण्याचे निर्देश दिले या भागातील गावकऱ्यांची समस्या नेहमीसाठी सुटावी या उद्दिष्टाने आता 80 कोटी रुपये खर्चून काँक्रीटचा रस्ता करण्याचे निर्णय घेण्यात आले आहे.
























