एक्स्प्लोर
Advertisement
खबऱ्यांनी पोलिसांना गंडवलं, 5 कोटी ऐवजी 3 कोटी सांगितले, 2 कोटी पळवले!
पोलिसांनी 29 एप्रिलला हवाला रॅकेटचा भांडाफोड करत 3 कोटी 18 लाख रुपये जप्त केले होते. मात्र ती रक्कम त्यापेक्षा जास्त असून, वरच्या अडीच कोटींवर खबऱ्यांनी डल्ला मारला.
नागपूर: हवाला रॅकेटचा भांडाफोड केल्याचा दावा करणारे नागपूर पोलीस अवघ्या चारच दिवसात तोंडघशी पडले आहेत. कारण हवाला रॅकेटची माहिती देणाऱ्या पोलिसांच्या खबऱ्यांनीच थोडे थोडके नव्हे तर अडीच कोटी रुपयांवर डल्ला मारल्याचं उघड झालं आहे.
पोलिसांनी 29 एप्रिलला हवाला रॅकेटचा भांडाफोड करत 3 कोटी 18 लाख रुपये जप्त केले होते. मात्र ती रक्कम त्यापेक्षा जास्त असून, वरच्या अडीच कोटींवर खबऱ्यांनी डल्ला मारला.
काय आहे प्रकरण?
नागपूर पोलिसांनी 29 एप्रिलला एका डस्टर कारमधून तब्बल 3 कोटी 18 लाख रुपये जप्त केले. पहाटे अडीच वाजता पोलिसांनी ही कारवाई केली.
रायपूरवरुन नागपूरला दाखल झालेल्या या डस्टर कारच्या प्रत्येक सीटच्या खाली, कार्पेटच्या आत छुपे लॉकर्स बनवण्यात आले होते. त्यामध्ये कोट्यवधींची रक्कम शिताफीने लपवली होती.
मात्र, नागपूर पोलिसांच्या खास खबऱ्यांनी डस्टर कार रायपूरवरुन नागपूरला दाखल होण्यापूर्वीच, पक्की खबर दिली. त्यावरुन नंदनवन पोलीस स्टेशनच्या पथकाने नागपूरच्या प्रजापती चौकात सापळा रचून, 3 कोटी 118 लाख रुपये जप्त केले.
पण, कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी त्या कारमध्ये 3 कोटी 18 लाख नव्हे, तर 5 कोटी 73 लाख रुपयांची रोकड असल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पोहोचली. तशी रीतसर तक्रारही झाली. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले.
खबरे महाबळेश्वरला पळाले
तोवर या प्रकरणात पोलिसांचे खबरे म्हणून जबाबदारी निभावणारे सचिन पडगीलवार, रवी माचेवार, पिंटू वासनिक आणि गजानन मुनमुने हे चौघे नागपुरातून पसार झाले होते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संशय बळावला.
संपूर्ण महाराष्ट्रभर चौघांच्या शोधासाठी अलर्ट देण्यात आले. हे चारही जण महाबळेश्वरमध्ये असल्याचं समजलं. 1 मेच्या संध्याकाळी चौघे महाबळेश्वरच्या एका हॉटेलमध्ये सातारा पोलिसांना सापडले.
सातारा पोलिसांनी त्यांना अटक करुन, नागपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. चौघांकडून काही लाख रुपयांची रोकडही पोलिसांनी जप्त केली. तसेच चौघांनी चौकशीत काही धक्कादायक कबुली दिली आहे.
खबऱ्यांची चलाखी
एबीपी माझाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी संबंधित डस्टर कार प्रजापती चौकावरून थेट नंदनवन पोलीस स्टेशनला आणण्याऐवजी काही वेळ एका अज्ञात ठिकाणी नेण्यात आले होते.
डस्टर कार चालवण्याची जबाबदारी पोलिसांवर नव्हे तर खबऱ्यांवर सोपवण्यात आली होती. त्याच अज्ञात ठिकाणी या चारही खबऱ्यांनी तडकाफडकीने डस्टर कारमध्ये बनवलेल्या छुप्या लॉकर्स मधून 2 कोटी 55 लाख रुपये लंपास केले. त्यानंतर ती कार नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली होती.
आता पोलिसांनी त्यांच्या चारही खबऱ्यांविरोधात लुटीचा गुन्हा नोंदविला असून, त्यांना या लुटीमध्ये पोलीस पथकातील कोणी अधिकाऱ्यांनी मदत केली होती का, याची चौकशी आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुरु केली आहे.
सध्या या प्रकरणाबाबत नागपूर पोलीस दलातील एकही वरिष्ठ अधिकारी काहीही बोलायला तयार नाही.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन सत्य सर्वांसमोर आणणे गरजेचे आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
सोलापूर
क्रिकेट
पुणे
Advertisement