नागपूर : अथक परिश्रम आणि खडतर मेहनत करुन पोलीस कर्मचारी, अधिकारी घडले जातात. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस कायम अलर्ट असतात. पण नागपुरात चक्क एका आयपीएस अधिकाऱ्याच्या शासकीय बंगल्यात चोरी झाली. एवढंच नाही तर अधिकाऱ्याला धक्काबुक्की देखील केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे खुद्द आयपीएस अधिकाऱ्याला स्वत:चं संरक्षण करता आलं नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


नागपुरात एका महिला आयपीएस अधिकाऱ्याने तिच्या शासकीय बंगल्यात चोरी आणि त्यांच्यासोबत धक्काबुक्की करत मारहाण झाल्याची तक्रार पोलिसात केली आहे. महिला आयपीएस अधिकारीच्या या तक्रारीनंतर नागपुरातील सदर पोलीस स्टेशनमध्ये चोरी आणि धमकी देऊन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी कमालीची गोपनीयता बाळगत असून अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती आहे. 


पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही घटना घडली. संबंधित महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या शासकीय बंगल्यात त्यांच्याच ओळखीच्या एका इसमाने त्यांच्यासोबत गैरव्यवहार करत त्यांना धक्काबुक्की केली. तसंच सुमारे एक लाख रुपये रोख आणि संपत्तीचे काही दस्तावेज चोरुन नेले, अशी तक्रार संबंधित महिला आयपीएस अधिकाऱ्याने दिली आहे. 


या तक्रारीनंतर नागपूर पोलिस दलात खळबळ माजली असून महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या घरी त्यांच्याशी गैरव्यवहार आणि चोरी कशी काय होऊ शकते असा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. पोलीस त्यातही आयपीएस अधिकाऱ्याला स्वत:चं रक्षण करता आलं तर सामन्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय असाही प्रश्न विचारला जात आहे.


दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित घटनेला दुजोरा दिला आहे, मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.


हे ही वाचा