नागपूर : 'कोरोना इतना बढे की बस मुझे ले जाये', 'डेथ इज गोल, मॅच्युरीरिटी इज द वे'.... वहीमध्ये अशा नोंदी नोंदवून आठवीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. आर्या मानकर असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव असून ती 13 वर्षांची होती. चंद्रमणी नगर परिसरातील राहत्या घरातच काल (4 एप्रिल) दुपारी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. 


आर्या मानकर ही नागपुरातील एका नामांकित शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकत होती. मानकर कुटुंब मध्यम वर्गीय कुटुंब असून संपूर्ण कुटुंब सुशिक्षित आहे. आर्या पण अभ्यासात खूप हुशार होती. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून ती सातत्याने वहीमध्ये मृत्यू आणि मृत्यूनंतरचा जग याविषयी विविध तज्ज्ञांचे विचार लिहून ठेवायची. त्यामुळे तिच्या मनात जगण्याविषयी नैराश्य निर्माण झालं असावं आणि त्या विचारातूनच तिने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.


या प्रकरणातील तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे काल सकाळपर्यंत आर्या एकदम सामान्य होती. नित्यनेमाप्रमाणे तिचे वडील कामावर गेले. मोठा भाऊ दुसऱ्या खोलीत अभ्यास करत होता आणि आई आंघोळीला गेली असताना अचानक आर्याने घरातच गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी अजनी पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून आर्याने लिहिलेले सर्व मजकूर ताब्यात घेत तपास सुरु केला आहे.


दरम्यान कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या माहितीप्रमाणे आत्महत्या करणारी आर्या एकलकोंडी होती. ती मोठ्या भाऊ आणि बहिणीसोबत जास्त बोलत नव्हती. फक्त आपल्या आईलाच शाळेतील काही गोष्टी सांगायची. तसंच तिचा स्वभाव काहीसा रागीट होता आणि ती सतत आपल्या नोटबुकमध्ये लिहित राहायची.


हे ही वाचा