Pune News : पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे मुलीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले, मुलगा हा वंशाचा दिवा समजला जातो परंतु झरेकर कुटुंबियांनी मुलगी हीच आपली वंशाचा दिवा आहे असं समजून मुलीच्या जन्माचे जंगी स्वागत करत गावातील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.


आमच्या संपूर्ण कुटुंबात एकही मुलगी नव्हती.


राजलक्ष्मी नावाच्या मुलीचा जन्म 22 जानेवारी रोजी भोसरी येथे तिच्या आईच्या घरी झाला आणि बाळाला खेडमधील शेलगाव येथे तिच्या घरी नेण्यासाठी हेलिकॉप्टर मागविण्यात आले, असे मुलीचे वडील विशाल झरेकर यांनी सांगितले, जे व्यवसायाने वकील आहे. ते म्हणतात, "आमच्या संपूर्ण कुटुंबात एकही मुलगी नव्हती. त्यामुळे, आमच्या मुलीचे स्वागत विशेष करण्यासाठी आम्ही 1 लाख रुपयांच्या चॉपर राइडची व्यवस्था केली आहे,” मुलीच्या जन्मानंतर तिला हेलिकॉप्टरमधून घरी आणण्यात आलंय, 


 






"आमच्या घरात खूप दिवसांनी मुलीचा जन्म झाला आणि त्यामुळे अत्यंत आनंद झाला आहे. म्हणून मी आणि माझी पत्नी, लेक राजलक्ष्मीला 2 एप्रिलला हेलिकॉप्टरने घरी आणले. यासाठी आम्ही देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी जेजुरीला गेलो, पण तेथे जाण्यासाठी परवानगी नसल्याने, आम्ही आकाशातून प्रार्थना केली," असे विशाल झरेकर म्हणाले.


स्वागतासाठी फुलांचे हार


मुलीच्या स्वागतासाठी फुलांच्या हारही घालण्यात आले. गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करून आई आणि बाळाचे स्वागत करण्यात आले. गावात हेलिकॉप्टर उतरताना आणि मुलीला पाहण्यासाठी ग्रामस्थही उपस्थित होते. मुलीच्या जन्माचे जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यात आले.