Anil Deshmukh : अनिल देशमुख यांनी सीबीआय कस्टडीच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं आहे. या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्यापुढे सुनावणी होणार आहे. गेल्या आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं दरमहा 100 कोटींच्या वसूली प्रकरणी सचिन वाझे, संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि अनिल देशमुख या चौघांचा ताबा घेण्याची परवानगी तपासयंत्रणेला दिली होती. त्यानुसार सीबीआयनं सचिन वाझेसह पालांडे आणि शिंदे या देशमुखांच्या दोन सहाय्यकांना सोमवारी सीबीआयकडून अटक करण्यात आली. अटकेनंतर या तिघांनाही मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टापुढे हजर केलं असता कोर्टानं या तिघांना सात दिवसांची सीबीआय कोठडी मंजूर केली. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिल देशमुख अचानक जेजे रूग्णालयात दाखल झाल्यानं त्यांना अटक होऊ शकली नाही. मात्र मंगळवारी देशमुखांना डिस्चार्ज दिल्यानं सीबीआय ताबा घेण्याआधीच देशमुखांनी त्याविरोधात हायकोर्टाचे दरवाजे ठोठावलेत.


 

अनिल देशमुखांच्या चौकशीत राज्य सरकारही सहकार्य करत नाही असा थेट आरोप सीबीआयच्यावतीनं कोर्टात करण्यात आला आहे. तसेच कोर्टाचे आदेश मिळताच अनिल देशमुखांच्या अचानक रूग्णालयात दाखल होण्यावरही सीबीआयनं सवाल उपस्थित केला होता. अनिल देशमुखांची कस्टडीची कोर्टाकडनं परवानगी गुरूवारी मिळाल्यानंतर आर्थर रोड जेल प्रशासनानं सोमावरी त्यांची कस्टडी देऊ असं सांगितलं होतं. मात्र सोमवारी जेव्हा सीबीआयचे अधिकारी आर्थर रोड जेलमध्ये गेले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की अनिल देशमुख बाथरूममध्ये पाय घसरून पडले ज्यात त्यांचा खांदा निखळल्यानं त्यांना जेजे रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अनिल देशमुखांशी संबंधित प्रकरणात जवळपास 400 कोटींच्या भ्रष्टाचाराची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. 



 


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांची ईडी मनी लाँड्रिंग आरोपांतर्गत चौकशी सुरू केली. 21 एप्रिल रोजी, देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवून 12 तासांच्या चौकशीनंतर 1 नोव्हेंबर रोजी ईडीनं देशमुखांना अटक केली. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत. 29 डिसेंबर 2021 रोजी ईडीनं देशमुखांसह अन्य आरोपींविरोधात पुरवणी आरोपपत्र आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए)अंतर्गत विशेष न्यायालयात दाखल केलेलं आहे. सुमारे सात हजार पानांचे आरोपपत्र असून या प्रकरणातील हे दुसरे आरोपपत्र होतं. मुंबई सत्र न्यायालयानं अनिल देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर देशमुखांनी हायकोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केलीय, ज्यावर पुढील आठवड्यांत सुनावणी होणार आहे.