नागपूर : नागपुरात काही तरुणींना केटरिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली ओडिशाला नेऊन तिथून त्यांच्यामार्फत अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. प्रतिस्पर्धी टोळीतील दोन गुंडांमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर नागपुरातील काही तरुणींचा फक्त अंमली पदार्थांच्या तस्करीत वापर होत नाही तर एक टोळी  दुसऱ्या टोळीचा छळ ही करत असल्याचे व्हायरल ऑडिओ क्लिप मधून समोर आले आहे. पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी अभिषेक पांडे व सोनू ठाकूर या दोघांना अटक केली आहे. तर तरुणींचा लैंगिक छळ करणाऱ्या काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. 


 नागपुरात अंमली पदार्थांच्या तस्करी करणाऱ्या आणि एकमेकांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या टोळ्यांमधील दोन गुंडांनी  फोनवर एकमेकांना धमकावले आणि त्यांच्या फोन कॉलचा ऑडिओ रेकॉर्ड व्हायरल होत पोलिसांपर्यंत पोहोचला. या फोन कॉलमध्ये धमकी देणारा अभिषेक पांडे नावाचा गुंड केटरिंगच्या व्यवसायाच्या नावाने नागपुरातील तरुणींना ओडिशामधील संबळपूरला न्यायचा आणि तिथून पार्टीच्या प्रवासात तरुणींच्या बॅगमध्ये अंमली पदार्थांची तस्करी नागपुरात करत असल्याचे स्पष्ट झाले.


दरम्यान, याच ऑडिओ क्लिपमधून समोर आलेली दुसरी धक्कादायक बाब म्हणजे अभिषेक पांडे सोबत ओडिशामधून अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सहभागी असलेल्या काही तरुणींना दत्तू नावाच्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुन्हेगाराने लक्ष्मी नावाच्या हॉटेलमध्ये नेऊन मारहाण केली होती. तसेच काही तरुणींचे लैंगिक छळ देखील केला होते. त्यात हॉटेल मालकाचा ही सहभाग होता. ऑडिओ क्लिपमधून अनेकांकडून तरुणींच्या लैंगिक छळाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत तपास गुन्हे शाखेकडे सोपवला आहे.


नागपुरात आधीच मार्च महिन्यात हत्येच्या 11 घटना घडल्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आलबेल नसल्याचे समोर आले होते. आता दोन गुन्हेगारांच्या एकमेकांना धमकावण्याच्या ऑडिओ क्लिपमुळे नागपुरात गुंड कोणाला ही घाबरत नाही. पोलिसांचा त्यांच्यावर वचक नाही हे अधोरेखित झाले आहे. 


संबंधित बातम्या :





LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha