Nana Patole : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल; नाना पटोलेंचे वक्तव्य
Gondia News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील जागा वाटपासंदर्भातील तिढा येत्या दोन चार दिवसात सुटेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
Gondia News गोंदिया : आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भातील तिढा येत्या दोन-चार दिवसात सुटेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) जागावाटपावरून अनेक दावे-प्रतीदावे केल्या जात होते. शिवाय, जागावाटपासंदर्भात काल, 22 फेब्रुवारीला होणारी बैठक आता थेट 27 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचं सांगितलं जातंय.
त्यामुळे मागील महिन्यात एकामागे एक होणाऱ्या बैठकांना कुठेतरी या महिन्यात ब्रेक लागल्याचे चित्र आहे. एकीकडे जागावाटपासंदर्भात चर्चा पूर्ण झाल्याचं सांगण्यात येतेय, तर काही जागांसाठी मविआमध्ये अजूनही भिजत घोंगडे आहे. यावर खुद्द शरद पवार यांनी भाष्य करत 11 ते 12 जागा आम्ही लढवणार असल्याचे वक्तव्य केले होते. यावर नाना पटोले यांना विचारले असता, शरद पवार साहेब काय बोलले हे मला माहिती नाही. मात्र येत्या दोन ते चार दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटप होऊन सर्व चित्र स्पष्ट होईल, असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
भंडारा आणि गडचिरोली लोकसभेबाबत नाना पटोलेंचे सूचक वक्तव्य
आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून योग्य उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भंडारा आणि गोंदिया या लोकसभेवर महायुतीकडून भाजपाचा उमेदवार लढण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीचा तिढा अद्याप पर्यंत सुटलेला नसला तरी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता, गडचिरोली आणि भंडारा या दोन्ही लोकसभांवर खूप वर्षानंतर पुन्हा काँग्रेसचा पंजा पाहायला मिळेल, असे सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केले. गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील कचारगड येथे होत असलेल्या भव्य यात्रेच्या दौऱ्यावर असताना नाना पटोले यांनी हे वक्तव्य केले आहे.
यापेक्षा शेतकऱ्यांचे दुसरे दुर्दैव काय?
दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाची धग वाढत असून आंदोलक आणि पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत एका तरुण शेतकऱ्याचा बुधवारी मृत्यू झाला. त्यानंतर शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी केंद्र सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. देशाचे प्रधानमंत्री लोकसभेमध्ये शेतकऱ्यांना आतंकवादी, खालीस्तानी आणि आंदोलनजिवी म्हणत असतील, तर यापेक्षा शेतकऱ्यांचे दुसरे दुर्दैव काय ? असा सवाल यावेळी पटोले यांनी उपस्थित केला.
एका वरिष्ठ नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे मुंबईला वयाच्या 86व्या वर्षी निधन झालं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संवेदना व्यक्त करत प्रशासकीय व्यवस्था मजबुतीने सांभाळणारं व्यक्तिमत्व आपल्यातून हरवल्याचे मत व्यक्त केले. मुख्यमंत्री असताना आणि लोकसभेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्याची इतिहासात नोंद आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची नेहमी भूमिका राहिली आहे. आज त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला, अशी संवेदना नाना पटोले यांनी बोलतांना व्यक्त केली.
जरांगे पाटील यांनी सरकारशी भांडावं, कुणावर टीका करू नये
मनोज जरांगे यांचे गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठ्यांना जितके आरक्षण मिळाला आहे, त्याच्यामध्ये समाधान मानावं. असं वक्तव्य केलं होतं. यावरून मनोज जरांगे यांनी विजय वडेट्टीवार यांना प्रतिउत्तर देत त्यांना राहुल गांधी यांनी मराठ्यांच्या विरोधात बोलायला सांगितलं का ? अशी टीका केली होती. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता, ते म्हणाले, मनोज जरांगे आणि सरकारचा वाद आहे. म्हणून जरांगे यांनी सरकारसोबत काय भांडायचे असेल ते भांडायला पाहिजे. मात्र कोणावर टीका त्यांनी करू नये, असा सल्ला नाना पटोले यांनी दिला. तर त्यांनी पुढे सरकारवर टीका करत हे फसवा-फसवीचे सरकार आहे. या सरकारवर आता कोणाचा विश्वास राहिला नाही, असेही पटोले म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या