'आप' नेत्याच्या हत्येचं गूढ उलगडलं
अकोल्यातील 'आप'चे नेते मुकीम अहमद यांची हत्या झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून अहमद बेपत्ता होते.
बुलडाणा : अकोल्यातील 'आप'चे नेते मुकीम अहमद हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा समोर आला आहे. पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवणारी टोळी हत्येमागे असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
गेल्या पाच दिवसांपासून अहमद बेपत्ता अहमद यांचा पोलीस शोध घेत होते. आज बुलडाण्यातील मेहकर तालुक्यात जानेफळ शिवारात अहमद यांचा मृतदेह सापडला होता. अहमद यांच्यासोबत बेपत्ता असलेले त्यांचे मित्र शफी कादरी यांचाही मृतदेह पोलिसांना सापडला.
अहमद आणि शफी कादरी यांचं 30 जुलैला अपहरण करण्यात आलं होते. अहमद यांची गाडी 30 जुलैला अकोल्यातील वाशिम बायपास चौक भागात बेवारस आढळून आली होती. अहमद बेपत्ता झाल्यानंतर अकोला पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.
मुकीम अहमद आपचे नेते होते, याशिवाय ते माहिती अधिकार कार्यकर्ते होते. अकोला जिल्हा परिषद उर्दू शिक्षक भरतीतील घोटाळा त्यांनी उघडकीस आणला होता. याशिवाय अकोल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी मुथ्थूकृष्णन शंकरनारायण यांचं कर्णबधिरात्वाचं प्रमाणपत्र काढत यात होणारा भ्रष्टाचार समोर आणला होता.
अहमद एकेकाळी समाजवादी पक्षाच्या युवक आघाडी असलेल्या युवाजन सभेचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर बसप, भारिप असा राजकीय प्रवास त्यांनी केला. समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंह यांच्या 'लोकमंच' पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षही होते.