पंतप्रधानांनी 'मन की बात'मधून गौरविलेले अकोल्याचे मुरलीधर राऊत काँग्रेसमध्ये, नाना पटोलेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 16 नोव्हेंबर 2016 मध्ये आपल्या 'मन की बात' कार्यक्रमातून मुरलीधर राऊत यांच्या कार्याचा मोठा गौरव केला होता. नोटबंदी काळात आपल्या 'मराठा' हॉटेलमध्ये प्रवाशांना त्यांनी मोफत जेवण दिलं होतं.
अकोला : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अकोला दौऱ्यात बाळापूर तालूक्यातील पारस फाटा येथील 'हॉटेल मराठा'चे संचालक आणि सुप्रसिद्ध शेतकरी मुरलीधर राऊत यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. गुरूवारी रात्री 'हॉटेल मराठा' येथे हा कार्यक्रम पार पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 16 नोव्हेंबर 2016 मध्ये आपल्या 'मन की बात' कार्यक्रमातून मुरलीधर राऊत यांच्या कार्याचा मोठा गौरव केला होता.
मुरलीधर राऊत यांचं बाळापूर तालूक्यातील पारस फाट्यावर 'हॉटेल मराठा' नावाचं हॉटेल आहे. 2016 मध्ये नोटबंदीच्या काळातील त्यांच्या एका सेवा कार्याने ते देशभरात चर्चेत आले होते. त्यांनी नोटबंदीच्या काळात आपल्या हॉटेलमध्ये महामार्गावरून जाणाऱ्या आणि नोटबंदीमुळे पैसे नसणाऱ्या प्रवाशांना महिनाभर मोफत जेवण दिलं होतं. त्यांच्या याच सेवेचा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमातून केला होता.
पुढे याच मुरलीधर राऊत यांचं 'हॉटेल मराठा' आणि शेत राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात भुसंपादीत झालं. मात्र, याचा योग्य मोबदला न मिळाल्याने त्यांनी तालूक्यातील दोनशे शेतकऱ्यांसोबत सरकारशी संघर्ष सुरू केला होता. मात्र, सरकार काहीच पावलं उचलत नव्हतं. यामुळे 5 ऑगस्ट 2019 ला सात शेतकऱ्यांसह अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात विषप्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ऐन विधानसभा निवडणकीच्या रणधुमाळीत हा मुद्दा तेंव्हाचे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं चांगलाच उचलून धरला होता. त्यामुळे या दोन घटनांनी मुरलीधर राऊत हे राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर चांगलंच चर्चेत आलेलं नाव आहे. त्यामुळे शेतकरी आणि हॉटेल व्यावसायिक असलेल्या मुरलीधर राऊत यांच्या काँग्रेस प्रवेशाला वेगळं महत्व आहे.
कोण आहेत मुरलीधर राऊत?
मुरलीधर राऊत यांचं अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालूक्यातील पारस फाट्यावर 'मराठा हॉटेल' आहे. कायद्याचे पदवीधर असलेले मुरलीधर राऊत हे बाळापूर तालूक्यातील शेळद गावाचे. मुरलीधर राऊत आणि त्यांचं 'हॉटेल मराठा' हे तालूक्यातील अनेक सामाजिक आणि धार्मिक घडामोडींचे केंद्र बनले आहे. ते शेळदचे माजी सरपंच होते. त्यांच्या पुढाकाराने शेळद गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक गेल्या वीस वर्षांपासून बिनविरोध होत आहे.
नोटबंदीच्या काळात त्यांनी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पैशांची काळजी न करता मोफत जेवण दिलं. कारण, तेंव्हा नोटबंदीमुळे पैसा असूनही तो मातीमोल झाल्याने लोकांचे मोठे हाल झाले होते. त्या काळातील त्यांचा हा उपक्रम देशभरात कौतुकाचा विषय ठरला होता. कोरोना काळातही राऊत यांनी महामार्गावर अडकलेले प्रवासी, ट्रकचालकांना कित्येक महिने मोफत जेवणाचा उपक्रम राबविला. यासोबतच गेल्या वर्षभरात त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे मोफत लग्न लावून देण्याचा उपक्रम सुरू केला. गेल्या वर्षभरातील कोरोना काळात त्यांनी तीसपेक्षा अधिक मुलींचे लग्न आपल्या हॉटेलवर मोफत लावून दिले.
नोटबंदीच्या काळातील सेवेमुळे देशभरात चर्चेत
मुरलीधर राऊत यांची देशाला ओळख झाली ती त्यांच्या सेवाकार्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' मध्ये केलेल्या स्तुतीने. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 16 नोव्हेंबर 2016 मध्ये आपल्या 'मन की बात' कार्यक्रमातून मुरलीधर राऊत यांच्या कार्याचा मोठा गौरव केला होता. मुरलीधर राऊत यांचं बाळापूर तालूक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील पारस फाट्यावर 'हॉटेल मराठा' नावाचं हॉटेल आहे. 2016 मध्ये नोटबंदीच्या काळात त्यांनी आपल्या हॉटेलमध्ये महामार्गावरून जाणाऱ्या आणि नोटबंदीमूळे पैसे नसणाऱ्या प्रवाशांना महिनाभर मोफत जेवण दिलं होतं. 'पैशांची काळजी करू नका. परत कधी या मार्गाने गेला तर पैसे द्या. परंतू, भरपेट जेवण करून जा', असा आग्रह ते प्रवाशांना करायचे. त्यामूळे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी त्यांचे अनेक माध्यमातून आभार मानले होते. 'मन की बात'मधून त्यांच्या कार्याचा जवळपास अडीच मिनिटं पंतप्रधानांनी गौरव केला होता. यामुळे देशपातळीवरील माध्यमांनीही त्यांची दखल घेतली होती.
भूसंपादन मोबदल्याच्या प्रश्न सोडविल्यामूळे राऊत काँग्रेसच्या जवळ
सुरत-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणासाठी बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांची महामार्गालगतची जमीन अधिग्रहित करण्यात आली होती. मात्र, या शेतकऱ्यांना प्रती गुंठा दोन ते चार हजार रुपयांचा मोबदला देत सरकारनं पानं पुसली होती. हा अन्याय झालेले मुरलीधर यांच्यासह जवळपास 200 वर शेतकरी होते. या शेतकऱ्यांनी मुरलीधर राऊत यांच्या नेतृत्वाखाली भूसंपादन मोबदल्यासाठी मोठं आंदोलन उभं केलं. तेंव्हा सरकार असलेल्या भाजपच्या अनेक बड्या नेत्यांना हे शेतकरी भेटलेत.मात्र, अकोल्यातील भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे हा प्रश्न प्रलंबितच राहीला.
या संघर्षामुळे कंटाळलेल्या राऊत यांच्यसह सहा शेतकऱ्यांनी अकोला अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या कक्षात विषप्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. 5 ऑगस्ट 2019 ला झालेल्या या घटनेनंतर राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं यावर मोठं रान उठवलं होतं. तेव्हा नाना पटोले या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी अकोला जिल्हा रूग्णालयात आले होते. पुढे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर विधानसभा अध्यक्ष झालेल्या नाना पटोलेंनी 2020 मध्ये पुढाकार घेत या शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावला. अन तेंव्हापासूनच मुरलीधर राऊत हे नाना पटोलेंच्या माध्यमातून काँग्रेसच्या जवळ आलेत.
'हॉटेल मराठा'वर दिग्गजांची पायधुळ
पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मधून गौरव केल्यानंतर राज्याच्या राजकारणातील अनेक दिग्गजांनी 'हॉटेल मराठा'वर भेट दिली होती. यामध्ये सध्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत, खासदार छत्रपती संभाजीराजे, माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, माजी मंत्री आमदार दिवाकर रावते यासह अनेक दिग्गज नेत्यांनी येथे भेट दिली होती. राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनीही राऊत यांचा जवळून परिचय आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रमनिरास केल्यानेच काँग्रेसमध्ये प्रवेश
दरम्यान, आपल्या काँग्रेस प्रवेशावर 'एबीपी माझा'शी बोलतांना मुरलीधर राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शेतकरी धोरणावर भ्रमनिरास झाल्यानेच काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं म्हटलं आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर शेतकऱ्यांचे 'अच्छे दिन'चं स्वप्न प्रत्यक्षात उतरू न शकल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांच्या भुसंपादनाच्या प्रश्नांत भाजपच्या केंद्र आणि राज्यातील जबाबदार लोकांनी त्याकाळात आश्वासनं देऊनही मदत न केल्यानेच आत्महत्येचा प्रयत्न करावा लागला होता, असं ते म्हणालेत. त्यामुळेच पुढच्या काळात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनात काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचं मुरलीधर राऊत म्हणालेत.
मुरलीधर राऊत यांच्यासारखा सामान्य परंतू प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या व्यक्तीच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा होणे यातच त्यांचं महत्व लक्षात येतं. या पक्ष प्रवेशाचा दोघांनाही किती अन कोणता फायदा होईल याचं उत्तरही येणारा काळच देईल.
महत्वाच्या बातम्या :