Ramdas Athawale : शिवसेनेतील (Shiv Sena) बंडाळीनंतर खरी शिवसेना कोणती? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिंदे गटाकडून वारंवार नवनवे दावे केले जात आहे. पक्षाच्या गटनेतेपदापासून सुरु झालेले दावा थेट पक्षचिन्हापर्यंत येऊन थांबले. सध्या शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई सर्वोच्च न्यायालयात आहे. अशातच आता शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दसरा मेळाव्याबाबत (Dasara Melava) मोठं वक्तव्य केलं आहे. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच (CM Eknath Shinde) आहे आणि शिवाजी पार्कचा (Shivaji Park) दसरा मेळावा एकनाथ शिंदेंचाच (CM Eknath Shinde) झाला पाहिजे, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे. 


केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले बोलताना म्हणाले की, "खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे, त्यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळतोय. त्यामुळे दसरा मेळाव्याला खऱ्या शिवसेनेला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे." 


रामदास आठवलेंनी यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंना दसरा मेळावा घ्यायला पर्यायही उपलब्ध करुन दिला आहे. ते म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांनी बीकेसी किंवा इतर कुठे मेळावा घ्यायला हरकत नाही. मात्र शिवाजी पार्कचा दसरा मेळावा जो आहे तो एकनाथ शिंदेंचाच झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे महानगरपालिकेनं त्यांना परवानगी द्यावी, अशी आमची महापालिकेला सूचना असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं आहे. केंद्रीय मंत्री आज कल्याणमध्ये कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत हे वक्तव्य केलं. 


वैयक्तिक पातळीवर भेटण्यास हरकत नाही, मात्र मनसेला सोबत घेतल्यास भाजपचा तोटा : रामदास आठवले


सध्या राजकीय वर्तुळात आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजप यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप मनसे युती झाल्यास आपला विरोध कायम असल्याचं स्पष्ट केलं. भाजप नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली याबाबत बोलताना आठवले यांनी व्यक्तिगत पातळीवर राज ठाकरे यांना भेटण्यास काही हरकत नाही, मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत आहे. एकनाथ शिंदेंचा गट हा भाजप सोबत आलेला आहे. मागच्या वेळेला भाजप आणि आरपीआय एकत्र असताना मुंबईत 82 जागा निवडून आणल्या होत्या. यंदा देखील 114 जागा निवडून येण्यात काही अडचण येणार नाही. राज ठाकरेंना घेतलं तर भाजपला नुकसान होऊ शकतं. उत्तर भारतीय, गुजराती, दक्षिण भारतीय मतं मिळणार नाहीत त्यामुळे तोटा होण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन पक्ष ताकदीनं भाजपच्या पाठीमागे उभा आहे. राज ठाकरे यांना सोबत घेण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


बाळासाहेबांचा फोटो वापरण्याचा एकनाथ शिंदेंना अधिकार : रामदास आठवले


बाळासाहेब हे काही एकट्या उद्धव ठाकरेंची होऊ शकत नाही. ते सर्व शिवसैनिकांचे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरण्यावरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला होता. याबाबत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बाळासाहेबांचं फोटो वापरण्याचा एकनाथ शिंदेंना अधिकार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ते तयार झाले आहेत. बाळासाहेब हे काही एकट्या उद्धव ठाकरेंचे होऊ शकत नाहीत, ते सर्व शिवसैनिकांचे आहेत. त्यांच्याच तालमीत तयार झालेले एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचा फोटो वापरायला हरकत नाही. शिवाजी महाराजांचा फोटो सगळे वापरतात. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सर्वजण वापरतात, तसा बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या लोकांना त्यांचा फोटो वापरण्याचा अधिकार आहे. तो काय फक्त उद्धव गटालाच वापरण्याचा अधिकार असला पाहिजे, असं काही नाही, असं त्यांनी सांगितलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :