Shivsena Dasara Melava: शिवसेना पक्षावर दावा होत असताना दुसरीकडे शिंदे गटाने दसरा मेळाव्यावरही (Dasara Melava)दावा केल्याने शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटातील (Shinde Group) वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दोन्ही बाजूंनी परवानगीसाठी महापालिकेकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाला महापालिकेने परवानगी दिल्यास शिवसेना कोर्टात धाव घेण्याच्या तयारीत आहे.


खरी शिवसेना कोणाची हा वाद सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असताना दुसरीकडे शिवसेनेचा पारंपरीक दसरा मेळावाही चर्चेत आहे. दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडत असतो. कोरोनामुळे या दसरा मेळाव्यात खंड पडला असला, तरी यावर्षी कोरोनाचे संकट काहीसं दूर झाल्याने निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचा शिवसेना दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यातून शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधणार याकडे अनेकांचे लक्ष होते. शिवसेनेने शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी महापालिकेकडे परवानगीदेखील मागितली आहे. मात्र, दुसरीकडे शिंदे गटाने दसरा मेळाव्यावर दावा सांगितला आहे. 


शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा आव्हान देताना दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आमचा असल्याचे म्हटले होते. शिंदे गटाकडून स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या अर्जावर अद्याप परवानगी मिळालेली नाही. या दोन्ही परवानगी अर्जाबाबत गणेशोत्सवानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. शिंदे गटानेही परवानगीसाठी अर्ज केल्यानं पुन्हा एकदा कुरघोडीचं राजकारण रंगल आहे. मुंबई महापालिकेने आम्हाला परवानगी न दिल्यास आम्ही कोर्टात दाद मागणार असल्याचे शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी म्हटले. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे असा आणखी एक वाद कोर्टात जाण्याची शक्यता आहे. 


शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण? 


शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणाचा होईल यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार शिवतीर्थावरच मेळावा घ्यायच्या तयारीला लागले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे आणि काही महत्त्वाच्या आमदारांची काही दिवसांपूर्वीच एक भेट झाली आहे. त्या बैठकीत शिवतीर्थावर मेळाव्याच्या तयारीचा पूर्व आढावा घेण्यात आला. या तयारीत कार्यकर्ते कोणत्या गेटनं आत येणार? नेते मंडळी कुठे आणि कसे बसणार? इतर जिल्ह्यातून ट्रेनने कार्यकर्ते येणार असल्याची माहिती आहे. ट्रेनने येणाऱ्या कार्यकर्त्यांना कोणत्या गेटनं आत घ्यायचं, व्हीव्हीआयपी लाईनमध्ये कोणकोणाला स्थान द्यायचं यासह इतर विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शिंदे गटाने दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण केली असल्याचे म्हटले जात आहे.