Ashish Shelar on Saamana Editorial : शिवसेनेतील (Shiv Sena) बंडाळीनंतर शिंदे गटानं (CM Eknath Shinde) भाजपसोबत (BJP) एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर आधी पक्षातील गटनेते पद, त्यानंतर पक्ष आणि त्यापाठोपाठ थेट पक्षचिन्हावरच शिंदे गटाकडून दावा करण्यात आला. अशातच आता शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करण्याच्या चर्चा आणि दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा मुंबई दौरा यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. यासर्व गोष्टींवरुन आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या (Saamana) अग्रलेखातून (Saamana Editorial) भाजपवर निशाणा साधण्यात आला होता. आता सामनातून भाजपवर केलेल्या टीकेला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 


शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र डागण्यात आलं होतं. याच सामनाच्या अग्रलेखाला आता आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. स्वतःचं अपयश झाकायला मराठी माणसाची शाल कशाला पांघरताय? फोडा झोडा सोडा, तुमचं तर मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा हेच मिशन सुरु आहे, असा जोरदार हल्लाबोल शेलारांनी शिवसेनेवर केला आहे. आशिष शेला यांनी यासंदर्भात एक पत्र जारी केलं आहे. काय म्हटलंय त्या पत्रात सविस्तर जाणून घेऊयात... 


फोडा-झोडा सोडा, तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा, या शिर्षकाखाली आशिष शेलार यांनी एक पत्र प्रसिद्ध केलं आहे. या पत्रातून त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे. "दुसऱ्यांना फोडाझोडा काय सांगता... पालिकेच्या मराठी शाळा बंद कुणी केल्या? सचिन वाझेला वसूलीला कुणी बसवले? ख्यातकीर्त डॉ अमरापूरकर यांचा बळी कुणी घेतला? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसावर गोळ्या झाडणाऱ्या काँग्रेससोबत सर्त्तेत कोण बसले? फोडा झोडा सोडा, तुमचे तर मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा हेच मिशन सुरु आहे, त्याचे काय?", असे प्रश्न आशिष शेलार यांनी शिवसेनेला विचारले आहेत. 


मराठी माणसात फूट, ही आरोळी 100% झुट, असं म्हणत आशिष शेलारांनी शिवसेनेचे सर्व आरोप धुडकावून लावले आहेत. ते म्हणाले की, "महापालिकेत अमराठी कंत्राटदार, बिल्डर यांनीच पोसले... तीन लाख कोटीचे कमिशन कोणी खाल्ले? गिरणी कामगारांना उध्वस्त कोणी केले? मराठी पोरांना फक्त वडापाव विकायला कोणी लावले..? आणि हे वर्षानुवर्षे मराठीच्या नावाने गळे काढायला मोकळे... आता म्हणे, पुढे चला? कुठे वसई की विरार ? की आणखी त्याच्यापण पुढे?" 


हे मिशन नव्हे "कमिशन" : आशिष शेलार 


"कर्तबगार नेते पक्ष सोडून गेले... बंधू" राजांनी वेगळी चूल मांडली... खासदार, आमदार, नगरसेवक कंटाळले....वाम मार्गाने मिळवलेले मुख्यमंत्री पद गमवावे लागले. हे सगळे अनर्थ एका अहंकारामुळे घडले.. तरी पेंग्विन सेनेचे अग्रलेखातून दुसऱ्यावर खापर फोडण्याचे मिशन सुरुच... स्वतःचे अपयश झाकायला मराठी माणसाची शाल कशाला पांघरताय? आपले अपयश झाकण्यासाठी आता मराठी कविता का आळवताय? आपल्या स्वार्थासाठी भगव्याला का बदनाम करताय?  नाचता येईना अंगण वाकडे! स्वतःचे अपयश झाकायला आता पर्याय तोकडे!", असं म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले आहेत.