Ambadas Danve Sinnar : मागील आठवड्यात गुरुवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने सिन्नर शहर व परिसरात घरांचे, दुकानांचे अंशत:, पूर्णत: नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी दौरा केल्यानंतर आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सिन्नर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ट्रक्टरवर बसून नुकसान पाहणी दौरा केला. 


नाशिक शहरासह जिल्ह्यात मागील आठवड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर गुरुवारी सिन्नर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होवून अवघ्या दोन तासात १६५ मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस झाल्याने घरांचे, दुकानांचे पूर्णतः वाताहत झाल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी सिन्नर शहरातील नुकसानग्रस्त भागांना भेटी देवून परिसराची पाहणी केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज सिन्नर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी ट्रक्टरमध्ये बसून अतिवृष्टी झालेल्या भागात पाहणी केली. 


दरम्यान सिन्नर परिसरात अनेक भागात ढगफुटीचा तडाखा बसला असून अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्याने अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. सिन्नरच्या बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने अद्यापही अनेक व्यावसायिक स्वच्छता करण्यात व्यस्त आहेत. तर एका ठिकाणी पूल वाहून गेल्याने संपर्कच तुटला आहे. त्यामुळे संबधित ठिकाणी मृतदेह 15किलोमीटरचा फेरा घेऊन न्यावा लागल्याची दुर्दैवी घटना काल उघडकीस आली. दरम्यान या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून सिन्नरच्या वंजारवाडी येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. नुकसानग्रस्तांना तत्काळ सरसकट मदत देण्यात यावी, अशा सूचना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.


प्रश्सानाकडून तात्पुरती सोय 
नदीकाठावरील घरांचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री अचानक पूर आल्याने  घरे,भिंती व घरसामान वाहून गेले आहे.नागरिकांना त्यांच्या कुठल्याही मालमत्तेला वाचवण्यची संधी   मिळालेली नाही. शहरातील व्यापारी पेठेत मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले असून व्यापाऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणावर ओला झाला आहे.  घटना घडल्यापासून प्रशानामार्फत बचाव व मदतकार्य सूरू करण्यात आले आहे. प्राथमिक स्वरूपाची मदत म्हणून अन्न, धान्य, तेल, चहा,दूध यांचे किट देण्याबरोबरच मंगल कार्यालये व शाळांमधून नागरिकांची राहण्याची व जेवणाची सोय प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. 


तर गिरीश महाजनांची बाईकवारी 
दरम्यान सिन्नरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मंत्री गिरीश महाजन सिन्नर दौऱ्यावर आले. त्यांनी यावेळी अतिवृष्टी झालेल्या भागांना भेटी देत पूरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सोमवारपर्यत सर्व पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मंत्री महाजन पाहणी करत असताना त्यांनी चक्क एका बाईकवर बसून प्रवास करत पूर ग्रस्त भागाची पाहणी केली.