मुंबई : मुंबई पोलिसांनी सचिन वाझेचा ताबा मिळवण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात अर्ज केला आहे. विकासक विमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंह आणि सचिन वाझेवर खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकरणी चौकशीसाठी सचिन वाझेचा ताबा हवा असल्याचं या अर्जात म्हटलेलं आहे. एनआयए कोर्टानं यावर 22 ऑक्टोबरच्या पुढील सुनावणीत सचिन वाझे सध्या दाखल असलेल्या रूग्णालयातून वाझेच्या प्रकृतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जेल प्रशासनाला दिले आहेत.



याच प्रकरणी मनसुख हिरेन हत्याकांडातील अन्य आरोपी पोलीस निरिक्षक सुनील मानेचीही चौकशी करण्याची मागणी क्राईम ब्रान्चनं कोर्टाकडे केली होती. ती मान्य करत 18 आणि 19 ऑक्टोबर असे दोन दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत मानेची चौकशी करण्याची परवानगी मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे.



दरम्यान सचिन वाझेनं मुंबई सत्र न्यायालयातील एका निकालाला हायकोर्टात आव्हान दिलं आहे. आपल्या राहत्या घरात नजरकैदेत ठेवण्याची वाझेनं केलेली मागणी विशेष एनआयए कोर्टानं फेटाळून लावली आहे. बायपास सर्जरी झाल्यामुळे तीन महिने घरीच नजरकैदेत ठेवण्याची मागणी करणारा वाझेचा अर्ज एनआयएच्या विरोधानंतर कोर्टानं फेटाळून लावला. तसेच वाझेला वोकहार्ट हॉस्पिटलतून आता जेलच्या रुग्णालयात शिफ्ट करण्याची परवानगीही कोर्टानं दिलीय. गरज लागलीच तर वाझेला जेजेतील जेल वॉर्डात दाखल करण्याची मुभा जेल प्रशासनाला देण्यात आली होती. ज्याला वाझेनं हायकोर्टात आव्हान दिलं असून त्यावर गुरूवारी सुनावणी होणार आहे.