अकोला :  डिसेंबर 2020 मध्ये झालेल्या राज्यातील विधान परिषदेच्याा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची निवडणूक 'महाविकास आघाडीने एकत्रित लढली होती. यात अमरावती विभाग शिक्षक, नागपूर विभाग पदवीधर, औरंगाबाद विभाग पदवीधर, पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर या पाच मतदारसंघाचा समावेश होता. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी ही निवडणूक एकत्र लढण्याचा परिणाम भाजपच्या पराभवात झाला होता. पाचपैकी पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चारही जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या होत्या. अमरावती शिक्षक मतदारसंघातून अपक्ष किरण सरनाईक विजयी झाले होते. 


मात्र, विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील आगामी निवडणुकांसंदर्भात शिवसेना वेगळी भूमिका घेण्याच्या पवित्र्यात आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये कार्यकाळ संपत असलेल्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेनेनं दीड वर्ष वेळ असतांनाच 'स्वबळा'चे 'शड्डू' ठोकले आहेत. 2023 मध्ये होणाऱ्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून 'महाविकास आघाडी'त आतापासूनच वाजण्याची चिन्ह आहेत. शिवसेनेने या मतदारसंघात लढायचं निश्चित केलं आहे. यासंदर्भात पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुखांना पक्षाच्या निवडणूक लढविण्याच्या निर्णयाचं पत्र पाठविलं आहे. या पत्रात निवडणुकीच्या पूर्वतयारी, पदवीधर मतदार नोंदणी, बैठका अशी सर्व जबाबदारी धिरज लिंगाडे यांच्याकडे दिल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे धिरज लिंगाडे हेच शिवसेनेचे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार राहणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. 




कोण आहेत धिरज लिंगाडे :


धिरज लिंगाडे हे बुलडाण्याचे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख आहेत. ते शिवसेनेत बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे कट्टर समर्थक समजले जातात. मुळात लिंगाडे यांचं घराण काँग्रेस विचारांचं. त्यांचे वडील रामभाऊ लिंगाडे हे शरद पवारांचे कट्टर समर्थक. रामभाऊ लिंगाडे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतांना शरद पवारांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री केले होते. पुढे शरद पवारांनी त्यांना विधानपरिषदेवर निवडून आणलं होतं. 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर रामभाऊ लिंगाडे राष्ट्रवादीत गेलेत. रामभाऊ लिंगाडे यांच्या निधनानंतर धिरज यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ते पक्षाचे जिल्हाप्रमुख झालेत. सध्या धिरज यांनी पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीवर भर दिला असून बुलडाण्यात पंधरा हजारांवर मतदार नोंदणी केली. 
    
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत अमरावती पदवीधर काँग्रेसकडे :


काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहे. 2010 पर्यंत माजी आमदार प्रा. बी.टी. देशमुखांनी सलग सहा टर्म म्हणजे 30 वर्ष या मतदारसंघाचे नेतृत्व केलं आहे. बीटींच्या प्रत्येक निवडणूकीत काँग्रेसचा त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा राहत होता. तर 2016 मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर संजय खोडके यांनी भाजपच्या डॉ. रणजित पाटलांना लढत दिली. मात्र, डॉ. रणजित पाटलांनी संजय खोडकेंचा सहज पराभव केला. आता संजय खोडके राष्ट्रवादीत आहेत. यावेळीही ते इच्छूक आहेत. तर काँग्रेसकडून नुकतेच भाजपमधून 'घरवापसी' केलेले माजी राज्यमंत्री डॉ. सुनिल देशमुख इच्छूक आहेत. यासोबतच अकोल्यातील डॉ. सुधीर ढोणे हेसुद्धा काँग्रेसकडून इच्छूक आहेत. तर सलग दोनदा विजयी झालेले भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा कार्यकाळ 7 फेब्रुवारी 2023 रोजी संपणार आहे. त्यांनाही भाजपमध्ये यावेळी उमेदवारीसाठी तगडी स्पर्धा असणार आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेनं 'महाविकास आघाडी'त या निवडणुकीसंदर्भात कोणतीच चर्चा न करता आपली निवडणुकीची तयारी गांभिर्याने सुरू केली आहे. त्यामुळे पुढच्या काळात या मतदारसंघाच्या उमेदवारीवरून 'महाविकास आघाडी'तील तीन्ही पक्षात घमासान रंगण्याची चिन्ह आहेत. 



धिरज लिंगाडेंनी सुरू केल्यात पाचही जिल्ह्यात गाठीभेटी : 


    अमरावती पदवीधर मतदार संघासाठी तयारीला लागा असा निरोप थेट पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच लिंगाडेंना दिल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. त्यानंतरच पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी 'शिवसेना भवना'तून पाचही जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि जिल्हाप्रमुखांना पत्र लिहित या निवडणुकीच्या मतदार नोंदणीत धिरज लिंगाडेंना मदत करण्याचे 'आदेश' दिलेत. यासंदर्भात 'एबीपी माझा'नं बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या उमेदवारीवर चर्चा झाली नसून सध्या फक्त मतदार नोंदणीवर भर असल्याचे म्हटलेय. तर संभाव्य उमेदवार धिरज लिंगाडे यांनी सध्या मतदार नोंदणी कार्यक्रम नियोजनासाठी पाचही जिल्ह्यात फिरत असल्याचे म्हटले आहे. लिंगाडेंनी बुलडाण्यात नोंदणीला सुरूवात केली. तर
काल आणि आज अकोल्यात आमदार, पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या भेटी घेतल्यात. या भेटीत त्यांनी आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. लिंगाडे बुधवारी आणि गुरूवारी अमरावतीत असणार आहेत. त्यामुळे दिड वर्षांपुर्वीच शिवसेनेनं या मतदारसंघात प्रचाराची प्राथमिक फेरी पूर्ण केल्याची चर्चा आहे. 
  
याआधी पदवीधरमध्ये दोनदा लढलेल्या शिवसेनेचे डिपॉझिट जप्त : 


   शिवसेना अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातून दोनवेळा निवडणूक रिंगणात होती. 1992 मध्ये अकोल्यातील सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. दीपक केळकर सेनेचे उमेदवार होते. मात्र, त्यांनाही डिपॉझिट गमवावं लागलं होतं. 2004 शिवसेनेचे कायदे आघाडीचे अॅडव्होकेट अनिल काळे पक्षाचे उमेदवार होते. मात्र, त्यांनाही आपलं 'डिपॉझिट' गमवावं लागलं होतं. दोन्ही वेळा अपक्ष प्रा. बी. टी. देशमुख विजयी झाले होते. त्यामुळे भूतकाळातील नामुष्की टाळण्यासाठीच शिवसेनेनं कदाचित दिड वर्षांपुर्वीपासूनच या मतदारसंघात बांधणी सुरू केली असावी, असं बोललं जात आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघावरून पुढील काळात 'महाविकास आघाडी'तील कुरघोडी पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्याचं राजकारण ढवळून काढणार, यात तिळमात्रही शंका नाही.