बीड : दसऱ्याला राज्यातील तीन दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते. नागपूरच्या संघ मुख्यालयात होणारा दसऱ्याचा कार्यक्रम त्यानंतर भगवान भक्ती गडावर होणारा पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा आणि तिसरा म्हणजे शिवसेनेचा मुंबईमध्ये होणारा दसरा मेळावा...
मागच्या दोन वर्षांपासून सगळे कार्यक्रम हे ऑनलाईन पद्धतीने होत होते. कोरोनाच्या संकटामुळे मोठे निर्बंध दसरा मेळाव्यावर आले होते. मात्र यावर्षी मुंबईमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात होणार आहे तर तिकडे पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरच्या दसरा मेळाव्याला प्रशासनाने परवानगी दिली आहे.
तीन वर्षापूर्वी भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला महंत नामदेवशास्त्री यांनी विरोध केला आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांनी भगवानबाबाच जन्मगावी सावरगाव मध्ये भव्य स्मारक उभारून दसरा मेळावा घेण्याची परंपरा कायम ठेवली मागच्या वर्षी याच ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा घेतला होता मात्र यावेळी पंकजा मुंडेंच्या विरोधात प्रशासनाने गुन्हे दाखल केले होते.
आता पुन्हा दसऱ्याला पंकजा मुंडे सावरगावमध्ये दसरा मेळावा घेणार आहेत त्यासाठी राज्यभरातील मुंडे समर्थक सावरगावला येणार आहेत. खरतर मागच्या दोन वर्षांमध्ये पंकजा मुंडे सोबत बऱ्याच राजकीय घटना घडल्या अगदी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डॉक्टर भागवत कराड यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. मात्र यावेळी प्रीतम मुंडे यांना डावलल्याची भावना कार्यकर्त्यात होती त्यानंतर पंकजा मुंडे यांनी सुद्धा त्यांच्यावर अन्याय होत असल्याची जाहीर करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठे आरोप केले होते.
आता पुन्हा दसरा मेळावा पंकजा मुंडे काय बोलणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्यात सध्या सावरगाव मधल्या भगवान भक्ती गडाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. गावकरी मैदानाची साफसफाई करताहेत तर मंदिराच्या तिन्ही भगवान बाबाच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे.