मुंबई: रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फोन टॅपिंग प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुंबईतील सायबर गुन्हे शाखेने नोटीस बजावली आहे. या प्रकरणात फडणवीस स्वतः बीकेसी येथील पोलीस ठाण्यात हजेरी लावणार होते. मात्र पोलिसांनी एक पाऊल मागे घेत त्यांच्या सागर या बंगल्यावर जाऊन चौकशी करण्याची भूमिका घेतली आहे.
त्यावर देवेंद्र फडणवीसांनी एक ट्वीट केलं असून त्यामध्ये म्हटलं आहे की, "सहपोलीस आयुक्त, गुन्हे यांचा दूरध्वनी मला आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलिस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ. मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात. जयहिंद, जय महाराष्ट्र !"
काय आहे फोन टॅपिंग प्रकरणफोन टॅपिंगप्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलीस ठाण्यात टेलिग्राफ कायद्यांतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, या मागणीसह शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर शुक्रवारी तातडीची सुनावणी पार पडली. यापूर्वी फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्थानकांतही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याविरोधात शुक्लां यांना नुकताच मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून 25 मार्चपर्यंत त्यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. याच प्रकरणात आता फडणवीसांना देखील चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.
भाजप नोटीसची होळी करणारबदली घोटाळा प्रकरणाचा अहवाल लीकप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची उद्या चौकशी होणार असल्याच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप उद्या रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिलाय. उद्या मुंबईत भाजपकडून नोटीसची होळी करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या: