बीड : जमिनीचे बनावट दस्तावेज आणि चुकीचा मोजणी नकाशा तयार करून 86 वर्षीय वृद्धाची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून भूमी अभिलेख अधिकारी आणि उप-अधीक्षाकासह चार जणांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबाजोगाई येथील हाऊसिंग सोसायटीत राहणारे वसंत धोंडीबा भावठणकर यांच्या मालकीची अंबाजोगाई शहरात गट क्र. 473 मध्ये 1 हेक्टर 31 गुंठे जमीन आहे. सदर जमिनीच्या उत्तरेकडे शेजारी असलेली जमीन शंकरराव जाधव यांच्या मालकीची असून त्यांनी ही जमीन 1988 साली विक्री केली होती त्यामुळे भावठणकर यांच्या उत्तरेकडे शंकरराव जाधव यांची कसल्याच प्रकारची जमीन नाही. त्यानंतर शंकर जाधव यांचे एकमेव वारस असल्याचे भासवून भीमराव जाधव आणि पद्मीनबाई भीमराव जाधव यांनी चुकीच्या नोंदी आधारे पूर्वी विकलेल्या जमिनीच्या चतुःसीमा टाकून हमीद सुलेमान गवळी आणि शेख निसार पाशामीर शाह शेख यांना बोगस खरेदी पत्र करून दिले. तसेच, या चौघांनी भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक राजेश लोंढे आणि उपअधीक्षक मनोज संधान यांच्याशी संगनमत करून खोटा, बनावटी मोजणी नकाशा तयार केला व भावठणकर यांची जमीन स्वतःची असल्याचे भासवून त्यांना जमिनीवरून बेदखल करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत वसंत भावठणकर यांचे नातू अभिजीत यांनी बीडच्या भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक कार्यालयात तक्रार केली. त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता सदर जमिनीची हेराफेरी करून जमीन हडपण्याचा प्रयत्न होत असल्याने भीमराव जाधव आणि पद्मिनीबाई जाधव यांनी तयार केलेला नकाशा रद्द केला असून अभिजीत भावठाणकर यांच्या फिर्यादीवरून हमीद सुलेमान गवळी, शेख निसार पाशामीर शाह शेख, भीमराव शंकरराव जाधव, पद्मीनबाई भीमराव जाधव, मनोज संधान आणि राजेश लोंढे या सहा जणांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात कलम 468, 469 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
अंबाजोगाईत जमीन हडपण्याचे प्रकार वाढले
अंबाजोगाई शहर आणि आसपासच्या परिसरातील जमिनीचे भाव दिवसागणिक प्रचंड वाढत आहेत. त्यामुळे भूमाफिया आणि गावगुंडांनी बनावट दस्तावेज करून जमिनी बळकावण्याचा सपाटा लावला आहे. गुंडागर्दी करून, धमकावून, जमिनीवर कब्जा करण्याचे प्रयत्न होत आहेत. वेळीच या गुंडांना आवरले नाही तर शांत आणि वास्तव्यासाठी सुरक्षित अशा अंबाजोगाईची असलेली ओळख धूसर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha