राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. यासंदर्भात बोलताना मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितलं की, ''नेमक्या कोणत्या कारणावरून त्यांना नोटीस दिली आहे, याबाबत मला माहिती नाही. याप्रकरणी गृह मंत्रालय किंवा ज्यांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. ते याबाबत भाष्य करू शकतील.'' महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आज यांच्या जयंती निमित्त वाय. बी. चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या कार्यक्रमानंतर पत्रकरांशी बोलताना ते असे म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत हे सरकार सुडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप केला आहे. जिथे भ्रष्टाचार होत आहे तिथे कारवाई होत नाही, मात्र आम्ही सांगितलं म्हणून आम्हाला अडकवायचे प्रयत्न होत असल्याचा आरोप ही फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले आहेत की, असं 100 टक्के होणार नाही. कोणतीही सुडबुद्धी किंवा कुणाला अडचणीत आणणे हा सरकारचा हेतू नसल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच पोलिसांनी त्यांना माहिती घेण्यासाठी बोलावलं असेल. त्यांच्यावर कारवाई करणे किंवा त्यांना अडचणीत टाकणे, असा हेतू सरकारचा नसल्याचं ही ते म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे सरकाराच्या मंत्र्यांविरोधात आणखी पुरावे असल्याचं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. यावर बोलताना पाटील म्हणाले, ''विरोधी पक्षाकडे लोक नेहमीच येऊन वेगवेगळे पुरावे देत असतात. ते त्यांनी सरकारला दिले, तर त्याचीही सरकार चौकशी करेल.'' तसेच विरोधी पक्षाकडून होत असलेल्या मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ते म्हणाले आहेत की, नवाब मालिकांवरील आरोप सिद्ध झाले नाहीत. त्यांचा राजीनामा घेणे योग्य नसल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या: