म्हाडाच्या मुंबईच्या घराबाबत मोठी अपडेट, 'या' दिवशी समजणार घर मिळालं की नाही?
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2030 घरांसाठी सोडत प्रक्रिया राबवली जात आहे. या घरांची सोडत जाहीर करण्याची तारीख समोर आली आहे.
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाकडून सध्या 2030 घरांसाठी सोडत प्रक्रिया राबवली जात आहे. मुंबईत घर घेण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी असून या सोडतीत भाग घेण्यासाठी 19 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. म्हाडाने या 2030 घरांपैकी साधारण 370 घरांच्या किमती 10 ते 12 लाखांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे लोकांना एका प्रकारे मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सध्या अर्ज प्रक्रिया भरण्याची प्रक्रिया चालू असून म्हाडाने घरांची सोडत जाहीर करण्याची तारीख सांगितली आहे. म्हणजेच म्हाडाने कोणाला कोणते घर मिळाले, हे कोणत्या तारखेला समजणार हे जाहीर केले आहे.
'या' तारखेला घर मिळालं की नाही ते समजणार
म्हाडाच्या संकेतस्थळावर 2030 घरांच्या सोडतीचा सविस्तर कार्यक्रम जारी केलेला आहे. या कार्यक्रमानुसार 19 सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना सोडतीत भाग घेण्यासाठी अर्ज करता येणार आहे. तर 8 ऑक्टोबर 2024 रोजी म्हाडाची सोडत जाहीर करण्यात येईल. म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी तुम्हाला घर मिळाले आहे की नाही हे समजेल. ज्या लोकांना घर मिळालेले नाही, त्यांना 9 ऑक्टोबरपासून त्यांनी जमा केलेली अनामत रक्कम परत केली जाईल.
अर्ज करण्यासाठी मुदत वाढवली
म्हाडाने काही दिवसांपूर्वी घरांच्या सोडतीत भाग घेण्यासाठी अर्ज करण्याच्या मुदतीत 15 दिवसांनी वाढ केली होती. ही मुदत वर नमूद केल्याप्रमाणे 19 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्जदारांना 19 सप्टेंबरपर्यंत अनामत रक्कम आणि अर्ज सादर करावे लागतील. याआधी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 13 सप्टेंबरपर्यंत वेळ देण्यात आली होती.
म्हाडाची घरं मुंबईतील कोणत्या भागात?
मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड गृहनिर्माण प्रकल्पामध्ये विविध उत्पन्न गटातील 2030 घरं सोडतीसाठी उपलब्ध करण्यात आली होती. म्हाडानं या घरांपैकी 370 घरांच्या किमतीत 10 लाख ते 12 लाख रुपयांची कपात केली आहे.
घरे स्वस्त करण्याचा निर्णय
म्हाडाने 2030 घरांसाठी सोडत जाहीर केल्यानंतर ही घरे खूपच महाग आहेत, अशी तक्रार केली जात होती. त्यानंतर म्हाडाने यातील काही घरांच्या किमतीही साधारण 10 ते 12 लाख रुपयांनी स्वस्त केली आहेत. त्याचाही फायदा सामान्यांना होणार आहे.
हेही वाचा :
39 लाखाचे घर 29 लाखात, 62 लाखाचे घर 50 लाखात; म्हाडाकडून खुशखबर, 370 घरं 10 ते 12 लाखांनी स्वस्त