Mumbai News: उन्हाची तीव्रता वाढली, बाष्पीभवनामुळे तलावांमधील पाणी आटण्याचा वेग वाढला, मुंबईवर पाणीकपातीचे संकट?
Maharashtra Politics: राज्यात सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. तापमाना वाढल्याने नदी आणि तलावांमधील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. मुंबईकरांना येत्या काही दिवसांमध्ये पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे तापमानाचा पारा सातत्याने चढता राहिला आहे. यामुळे विशेषत: पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट होताना दिसत आहे. वर्षभरातील वापरामुळे अनेक भागांमध्ये पाण्याचा साठा संपत आला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रांमध्येही सध्या हीच परिस्थिती आहे. मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रांत प्रचंड उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने तलाव तळ गाठू लागले आहेत. परिणामी सातही तलावांमध्ये सध्या केवळ 245670 दशलक्ष लिटर म्हणजेच 16.97 टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. हा पाणीसाठा गेल्या तीन वर्षांतील नीचांकी आहे. त्यामुळे मुंबईवर पाणीकपातीचे (Water Cut) संकट ओढावण्याची शक्यता आहे.
सध्या राज्य सरकारने राखीव पाणीसाठा वापरण्याची मुभा दिल्यामुळे तुर्तास चिंता करण्याचे कारण नाही. मात्र, पाऊस उशीरा आल्यास मुंबईवर ‘जल संकट’ येण्याचा धोका आहे. त्यामुळे मुंबईत 10 ते 15 टक्के पाणीकपात होण्याची शक्यता आहे. याबाबत पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईतील पाणीकपातीबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांतून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी या तलावांच्या परिसरातील पर्जन्यमान मुंबईकरांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरते. सध्याच्या घडीला या सातही तलावांमध्ये असणारा 16.97 टक्के हा पाणीसाठा फारतर पुढील दीड महिना पुरेल. मुंबई महानगरपालिकेच्या नियोजनानुसार दिवसाला एक टक्का या हिशेबाने महिन्याला 12 ते 13 टक्के पाण्याचा वापर होतो. त्यामुळे पुढील दीड महिने हा पाणीसाठा सहज पुरला असता. परंतु, उन्हाचा कडाका वाढल्याने पाण्याची वेगाने वाफ होत आहे. परिणामी या सातही तलावांमधील पाण्याची पातळी वेगाने कमी होत आहे. मे महिना संपण्यासाठी आणखी 23 दिवस शिल्लक राहिले आहेत. या काळात उन्हाची तीव्रता जास्तच राहील. परिणामी या काळात तलावातील पाणीपातळी आणखी खालावण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा मान्सून मुंबईत कधी प्रवेश करणार, यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत.
पाऊस लांबल्यास पाणीकपात अटळ
गेल्यावर्षीच्या तुलनेत मुंबईच्या सातही तलावांमध्ये 7 टक्के कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. अप्पर वैतरणा धरणातून 93 हजार 500 मिलियन लिटर व भातसा धरणातून 1 लाख 37 हजार मिलियन लिटर राखीव पाणीसाठा वापरण्याची परवानगी मिळाली आहे. हे पाणी मिळून जुलैपर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. मात्र, राज्यात मान्सून दाखल होण्यास उशीर झाल्यास मुंबईकरांची पाणीकपात अटळ असल्याचे दिसत आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील उपलब्ध पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
अप्पर वैतरणा 31435
मोडकसागर 27536
तानसा 49344
मध्य वैतरणा 21948
भातसा 104210
विहार 8331
तुळशी 2867