(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई-गोवा महामार्गाबाबत महत्वाची बातमी; गणेशोत्सव संपेपर्यंत अवजड वाहनांना बंदी, सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण यांची घोषणा
आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खड्डे मुक्त करण्यासाठी सध्या मुंबई गोवा महामार्गावर काम जलद गतीने सुरू असून त्यामुळे जड वाहतूक बंद केली आहे.
मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai- Goa Highway) 27 ऑगस्ट ते गणेशोत्सव संपेपर्यंत (28 सप्टेंबर) अवजड वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही घोषणा केली आहे. 27 ऑगस्ट ते 28 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीला बंदी म्हणजे एक महिना अवजड वाहतुकीवर बंदी असणार आहे.
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (Mumbai goa highway) काम गेली बारा वर्षांपासून रखडले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मनसेनं (MNS) मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) खड्ड्यांविरोधात रणशिंग फुंकलं. मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरूनन मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यानंतर प्रशासन कामाला लागले असून डिसेंबर 2023 पूर्वी संपूर्ण महामार्ग पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खड्डे मुक्त करण्यासाठी सध्या मुंबई गोवा महामार्गावर काम जलद गतीने सुरू असून त्यामुळे जड वाहतूक बंद केली आहे. यासाठी वाहन चालकांनी पर्यायी महामार्गाचा वापर करावा असं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.
पाहणी, दौरे,आश्वासने मात्र महामार्गाचं काम मात्र जैसे थे
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (Mumbai goa highway) काम गेली बारा वर्षांपासून रखडले आहे. या महामार्गावरील रस्त्याची अवस्था आणि त्यावरील खड्डे याची वारंवार चर्चा होत असते. या मार्गावरुन प्रवास करणारे नागरिक या रस्त्याच्या अवस्थेबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित करत असतात. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचं देखील पाहायला मिळतं. दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा ठसठशीतपणे समोर येतो. मग आंदोलने सुरू होतात, पाहणी दौरे होतात, आश्वासने दिली जातात. न्यायलये सरकारला खडसावतात मग सरकार एक नवी डेडलाईन देतं. गणपती बाप्पा गावाला जातात आणि महामार्गाचं काम मात्र जैसे थेच राहतं. दीड दशक उलटलंय पण यात तसूभरही फरक पडलेला नाही...
मनसेची आज पदयात्रा
12-13 वर्षांपासून रखडलेल्या आणि तब्बल 15 हजार कोटी रुपये खर्च करून अपूर्ण राहिलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी आता मनसे आक्रमक झाली. या मार्गाचं काम वेगाने पूर्ण करावं, यासाठी मनसेच्या जागर यात्रेला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पळस्पे येथून या यात्रेला सुरुवात होत आहे. मनसेच्या आठ नेत्यांची रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून पदयात्रा असून असून या पदयात्रेचा समारोप कोलाडमध्ये होणार आहे. त्यानंतर कोलाडमध्ये जागर यात्रेच्या संगमस्थळी राज ठाकरे भाषण करणार आहेत.
हे ही वाचा :