विठ्ठल हराळे विक्रीकर निरीक्षक परिक्षेत भटक्या विमुक्त प्रवर्गातून राज्यात प्रथम
विठ्ठल हराळे याची विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाली आहे. भटक्या विमुक्त प्रवर्गातून राज्यात प्रथम आला आहे. कष्ट, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक परिक्षेत हे यश संपादित केलं आहे.
पंढरपूर : आधिकाऱ्यांचे गाव अशी ओळख असलेल्या माढा तालुक्यातील उपळाईमधून आणखी एक तरुणाची विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाली आहे. भटक्या विमुक्त प्रवर्गातून राज्यात प्रथम येण्याचा मान त्याने मिळवला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेचा (एसटीआय) निकाल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आला. या परीक्षेत माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील विठ्ठल गणपत हराळे याने राज्यात दहाव तर भटक्या विमुक्त प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांकाने होत घवघवीत यश संपादन केलं आहे.
विठ्ठल यांचे प्राथमिक शिक्षण उपळाईच्या जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण गावतीलच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि अकरावी-बारावीचे शिक्षण सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात झाले. उच्च माध्यमिक बी फार्मसीचे शिक्षण कराड येथे घेऊन एमएस फार्मचेही शिक्षण पूर्ण केले. विठ्ठल हराळे यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट. आई-वडील शेतमजुरी करून मुलांना शिक्षण देत होते. वडील कामावर असताना विजेच्या धक्क्याने मुत्यू झाला. त्यामुळे कुटूंबाचा सारा भार त्यांचे मोठे बंधू बिरुदेव हराळे यांच्यावर पडला. विठ्ठल हे शिक्षणात हुशार असल्याने त्यांना शिक्षण देण्यासाठी बंधू बिरुदेव यांनी शिक्षण सोडून कष्ट करत कुटुंबांचा गाडा हाकत भावाला शिक्षण दिले. घरच्या परिस्थितीची जाण ठेवत विठ्ठल यांनीही चांगल्या गुणवत्तेने उच्च शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण होताच गुणवत्तेच्या जोरावर त्यांना पुणे येथे सहायक प्राध्यापक म्हणून नोकरीही मिळाली.
मात्र कुटुंबांची इच्छा प्रशासकीय अधिकारी व्हावे अशी असल्याने 2015 पासून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरु केला होता. त्यानंतर कष्ट, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक परिक्षेत राज्यात दहावा तर भटक्या विमुक्त प्रवर्गातून राज्यात पहिला येण्याच मान पटकावला. निवडीची वार्ता गावात समजताच गावात फटक्यांची आतिषबाजी करत आनंद साजरा करण्यात आला. एक आठवड्यांपूर्वी याच गावातील अनिता हवालदार ही न्यायाधीश परिक्षेत राज्यात प्रथम आली होती. त्यात विठ्ठव हराळे यांचे यश राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील गावात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
कष्ट केले की यश मिळतेच याचा अनुभव आला. एवढ्यावरच न थांबता पुढे यापेक्षा मोठ्या पदावर पोचण्यासाठी तयारी सुरुच ठेवून मनात ठरवलेले घ्येय गाठणार असल्याची प्रतिक्रिया विठ्ठल हराळे यांनी दिली आहे.