Sanjay Raut : नवीन चिन्हाबाबत चर्चा सुरू; संजय राऊतांचं सूचक वक्तव्य
Sanjay Raut : उद्धव ठाकरे यांच्याकडून नवीन चिन्हासाठी हालचाली सुरू असल्याचं सूचक वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
मुंबई : आमच्या चिन्हाची चोरी केली आहे. या चोरीचा म्होरक्या कोण आहे हे आम्ही शोधणार आहोत. लवकरच या चोरीच्या सरदाराबाबत खुलासा करणाार आहोत. चिन्ह चोरीत दिल्लीच्या मोठ्या लोकांचा सहभाग आहे. या चोरांबाबत जनतेला देखील जागृत करणार आहोत, असे सांगत नवीन चिन्हाबाबत आमच्या चर्चा सुरू आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी दिली आहे.
संजय राऊत आज कोकण दौऱ्यावर होते. मुंबईत परत आल्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं आहे. निवडणूक आयोगानं शुक्रवारी एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली. विरोधी पक्षातील नेत्यांनी या निर्णयाला अनपेक्षित निर्णय म्हटलं. तर भाजपकडून याचं स्वागत करण्यात आले. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह हातातून गेल्यानंतर ठाकरे गटाकडून आता नवीन पक्षचिन्ह मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. संजय राऊत यांनी शनिवारी याबाबत सूचक वक्तव्य केलं. उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ते म्हणाले की, "आजच मी कोकणात जाऊन आलो आहे. तेथील कार्यकर्त्यांसोबत बोलणं झालं असून नवीन चिन्हाबाबत आमची चर्चा सुरू आहे. "
चोरांना ही चोरी पचणार नाही, राऊतांचा भाजपवर हल्लाबोल -
संजय राऊत यांनी यावेळी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. "अलीकडे महाराष्ट्रात मंदिरांवर दरोडे पडत आहेत. या दरोड्यांमध्ये मंदिरांचे कळस आणि मुर्त्यांची चोरी होत आहे. परंतु, आमच्या मंदिरातून धनुष्यबाणाची चोरी झाली आहे. परंतु, लवकरच आम्ही या चोराची माहिती काढणार आहोत. चोरांना ही चोरी पचणार नाही. लोक यांना धडा शिकवतील, असा टोला यावेळी संजय राऊत यांनी लगावला.
'आम्ही पुन्हा सत्तेत येणार'
"काहीपण करा आम्ही घाबरणार नाही. आमचा पक्ष पुन्हा सत्तेत येणार. भाजपवाले आधी म्हणत होते मोदींचा मुखवटा लावून शिवसेनेला मतं मागावी लागत आहेत. परंतु, आता बाळासाहेब ठाकरे यांचा मुखवटा लावून भाजपला मुंबईत प्रचार करावा लागत आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
मशाल चिन्हावर समता पक्षाचा दावा
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात धाव घेतली. यावेळी ठाकरे गटाला निवडणूक आयोगानं 'मशाल' हे पक्षचिन्ह दिलं आहे. पण हे चिन्ह समता पक्षाचं आहे, त्यामुळे समता पक्षाने या चिन्हावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळेच शिवसेनेने नवीन चिन्हाबाबच चर्चा सुरू केल्याची माहिती मिळत आहे.